मृत्यूदर एक टक्क्यावर आणण्याचे उद्दिष्ट – आरोग्यमंत्री राजेश टोपे


मुंबई :- राज्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असून बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असून टेलिआयसीयू प्रकल्प त्यासाठी उपयुक्त ठरत आहे. त्याच्या मदतीने कोरोनामुळे होणारा मृत्यूदर एक टक्क्यावर आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगत टेलिआयसीयूचा राज्यभरात विस्तार करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सकारात्मक असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले.


राज्यात भिवंडी, औरंगाबाद, जालना, सोलापूर पाठोपाठ आज जळगाव आणि अकोला येथील रुग्णालयांमध्ये टेलिआयसीयूचा शुभारंभ आरोग्यमंत्री श्री. टोपे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. जळगाव आणि अकोला जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकीत्सक, वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता आदी यावेळी उपस्थित होते.


आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले, आरोग्य सुविधेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर ही चिंतेची बाब असून मृत्यूदर एक टक्क्यापेक्षाही कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यात विशेषज्ञांची जाणवणारी कमतरता टेलिआयसीयू तंत्रज्ञानामुळे काहीशी भरून निघणार असून कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर विशेषज्ञांच्या मार्गदर्शनातून उपचार झाले तर मृत्यूदर कमी होण्यासाठी त्याचा लाभ होईल.


राज्यात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. या औषधाचा सर्रास वापर न करता डॉक्टरांनी जपून आणि ज्यांना आवश्यकता आहे अशा गंभीर रुग्णांसाठी ते वापरावे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले.


राज्याचा मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. टेलिआयसीयू सुविधा सध्या सहा जिल्ह्यांमध्ये सुरु आहे. राज्यात अन्यत्रदेखील सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झाली असून ते याबाबत सकारात्मक आहेत. ही सेवा राज्यभर सुरु झाल्यास दुर्गम भागातील रुग्णांनादेखील विशेषज्ञांच्या उपचाराचा लाभ मिळू शकेल, असे आरोग्यमंत्री श्री.टोपे यांनी सांगितले.


मेडिस्केप इंडिया फाउंडेशनच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या (सीएसआर) माध्यमातून ही सुविधा देण्यात येत आहे. यावेळी मेडिस्केप इंडिया फाऊंडेशनच्या डॉ. सुनिता दुबे यांनी या तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली.


Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image