संसदेत संमत झालेली कृषी विधेयकं म्हणजे कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणारा निर्णय असल्याचं पियुष गोयल यांचं प्रतिपादन


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अलिकडेच संसदेत संमत झालेली कृषी विधेयकं म्हणजे कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणारा निर्णय आहेत असं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत, वार्ताहरांशी बोलत होते. या विधेयकांमुळे यामुळे शेतकरी तसंच देशाच्या कृषी क्षेत्राच्या जलद विकासाचे मार्ग खुले होतील.

विधेयकांच्या अंमलबजवणीमुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होऊन, त्यांचं जीवनमान उंचावेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांचं सक्षमीकरण करणं, हे प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या केंद्र सरकारचे प्राधान्यक्रमावर असल्याचंही ते म्हणाले.

या विधेयकांमुळे आपला शेतमाल विकण्याच्या बाबतीतल्या बंधनांतून शेतकऱ्यांची मुक्तता झाली आहे. आता त्यांना त्यांचा शेतमाल रास्त भावात विकण्याचं स्वातंत्र्य मिळालं आहे असं ते म्हणाले. या विधेयकांअंतर्गत असलेली कंत्राटी शेतीची तरतूद म्हणजे सक्ती नसून, तो एक पर्याय असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

शेतमालाची किमान आधारभूत किंमत कायम राहील असं त्यांनी सांगितलं. यावेळी गोयल यांनी केंद्र सरकारनं गेल्या सहा वर्षात शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या योजना आणि घेतलेल्या निर्णयांची माहितीही दिली.

शेतमालाच्या वाहतूकीसाठी सुरु केलेल्या किसान रेलला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. हंगामानुसार फळं आणि भाजीपाल्याच्या वाहतुकीसाठी रेल्वे आणि कृषी मंत्रालय किसान रेल कोरिडॉर तयार करायचे प्रयत्न सुरु आहेत.

अशी माहिती त्यांनी दिली. संत्र्याचा हंगाम सुरू झाल्यावर, संत्र्यांची देशभर वाहतूक करण्यासाठी नागपूरहून किसान रेल्वे सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव असल्याची माहितीही त्यांनी दिली.