कोरोना प्रतिबंधात्मक उपायांचं जबाबदारीनं पालन करावं असं प्रधानमंत्र्यांचं देशातल्या जनतेला भावनिक आवाहन


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मला देशातल्या प्रत्येक नागरिकाला सुरक्षित पाहायचं आहे, त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव संपला आहे असा गैरसमज करुन न घेता, कोरोना प्रतिबंधात्मक उपायांचं जबाबदारीनं पालन करण्याचं भावनिक आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या जनतेला आज केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशवासिंना संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते. कोरोना प्रादुर्भावानंतर आता हळू हळू जीवनचक्र गती घेऊ लागलं आहे. देशात आता लॉकडाऊन सारखी परिस्थिती नाही, मात्र तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव संपुष्टात आलेला नाही याचं भान आपण जपलं पाहीजे, पुर्वपदावर येत असलेल्या आपल्या देशाची गती मंदावू नये यासाठी प्रतिबंधित सुरक्षा उपायाचं पालन करत राहीलं पाहिजे असं मोदी यांनी सांगितलं. 


काही लोक सुरक्षा उपायांच्या बाबतीत निष्काळजीपणा दाखवत असल्याचं त्यांनी आजच्या संबोधनात नमूद केलं. मात्र असं वागून आपण स्वतःसह आपण आपलं कुटुंब, अबाल वृद्ध यांना संकटात टाकत आहोत याची जाणिव त्यांनी नागरिकांना करून दिली. 


भारतात जगाच्या तुलनेत कोरोना प्रादुर्भावाची स्थिती नियंत्रणात असल्याची सांगताना, त्यांनी जगातल्या प्रमुख देशांसोबतची तुलनात्मक आकडेवारीही मांडत, कोरोनाविरुद्धच्या लढ्यालं भारताचं यशही देशासमोर मांडलं. भारतात दर दहा लाख लोकसंख्येमागे सुमारे साडेपाच हजार लोकांना कोरोनाची लागण झाली, तर अमेरिका आणि ब्राझीलमधे हेच प्रमाण २५ हजार इतकं असल्याचं त्यांनी सांगितलं.

भारतात दर दहा लाख लोकसंख्येमागे कोरोना मृत्यूचं प्रमाण ८३ इतकं आहे, तर अमेरिका ब्राझील स्पेन, ब्रिटनमधे हे प्रमाण ६०० इतकं जास्त असल्याची माहिती देत, जगभरातल्या साधनसंपन्न देशांच्या तुलनेत भारत आपल्या जास्तीत जास्त रुग्णांचा जीव वाचवण्यात यशस्वी ठरला असल्याचं त्यांनी नमूद केलं. 


कोरोनाबाधित रुग्णांवरच्या उपचारांसाठी देशभरात सध्या ९० लाखाहून अधिक खाटा, १२ हजाराहून अधिक विलगीकरण केंद्र, तर कोरोना चाचण्यांसाठी सुमारे २ हजार प्रयोगशाळा उभारली असल्याची माहिती त्यांनी दिली. कोरोना निदानाच्या चाचण्यांची वाढलेली संख्या ही आपली ताकद ठरली आहे असं ते म्हणाले. देश लवकरच १० कोटी कोरोना चाचण्यांची संख्या गाठेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


देभरातल्या लाखो कोरोनायोध्यांनी सेवा परमो धर्मो या तत्वानुसार भारताच्या मोठ्या लोकसंख्येची निस्वार्थ सेवा केली अशा शब्दांत त्यांनी कोरोनायुद्ध्यांच्या कामगिरीची प्रशंसा केली. 


कोरोनावरची लस आल्यानंतर, भारतातल्या प्रत्येक नागरिकाला ती मिळावी यासाठी केंद्र सरकारनं नियोजन सुरु केलं असल्याची माहिती त्यांनी दिली. देशातल्या प्रत्येक नागरिकाला सणांचा आनंद घेता आला पाहिजे, असं आपल्याला वाटतं, त्यामुळे जोपर्यंत कोरोनावर लस येत नाही, तोपर्यंत कोणताही निष्काळजीपणा न दाखवता, मास्क लावणं, वारंवार हात स्वच्छ धुणं आणि परस्परांपासून सुरक्षित अंतराचं पालन केलं पाहीजे असं आवाहन करत दसरा, दिवाळी, ईद, तसंच गुरुनानक जयंतीसह आगामी सणांच्या शुभेच्छा त्यांनी जनतेला दिल्या.