ठाणे : सर्वसामान्य जनतेला पोलिसांची आदरयुक्त भीती आणि गुन्हेगारांना दहशत वाटली पाहिजे. सागरी सुरक्षेबरोबरच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून आदर्श , सुरक्षित व गतिमान अशी मीरा भाईंदर, वसई-विरार आयुक्तालयाची ओळख निर्माण करावी असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे ई-उद्घाटन झाले.
यावेळी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले अनेक दिवसांपासुन आयुक्तालयाची मागणी होती. शहरांच्या कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही अत्यावश्यक बाब होती. या शहरांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढते आहे. येथील स्थानिक जनतेच्या मनात पोलिसांविषयी मित्रत्वाची भावना निर्माण करतानाच वाईट कृत्य केल्यास पोलिसांचे आपल्यावर लक्ष आहे ही भीती प्रत्येकाला वाटली पाहिजे. जनतेचे रक्षण हे पोलिसांचे प्रथम कर्तव्य आहे. गुंडगिरीला आळा घालण्याबरोबरच महिलांसाठी सुरक्षित वातावरण तयार करावे. आपल्या कर्तव्यकठोर कामगिरीने आदर्श आयुक्तालय म्हणून नावलौकिक मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत. शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे आहे असेही श्री ठाकरे यांनी सांगितले.
पोलिसांचे आरोग्यही महत्त्वाचे
केवळ कर्तव्य म्हणून नव्हे तर एक माणूस म्हणून पोलिसांकडे बघितले जावे. कोरोना काळात त्यांच्या आरोग्याची तसेच कुटुंबियांची कळजी घेण्यात यावी असेही श्री. ठाकरे यांनी सांगितले. पोलिस आयुक्त सदानंद दाते हे निश्चितच आदर्श कार्य करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने हे पोलिस आयुक्तालय आवश्यक होते. मुंबई, पालघर, ठाणे या जिल्ह्यांशी समन्वय ठेवून काम करावे लागणार आहे. तसेच सागरी सुरक्षेला गांभीर्याने घेऊन काम करावे या आयुक्तालयासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
कोरोना काळात पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याच्या दृष्टीने योग्य तो निर्णय घेतला जाईल. सामाजिक बांधिलकी म्हणून पोलिसांनी खूप चांगले काम केले आहे. या सर्व बांधवांचा राज्याला अभिमान आहे. पोलीस बांधवांच्या कुटुंबियांचे योगदान अमूल्य आहे. असेही श्री. पवार यांनी सांगितले.
गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, कायदा व सुव्यवस्था तसेच सागरी सुरक्षेच्या दृष्टीने हे आयुक्तालय महत्त्वाचे आहे. आयुक्त सदानंद दाते यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तालय निश्चित चांगली कामगिरी करेल.पुरेसा निधी साधनसामुग्री, मनुष्यबळ, लवकरात लवकर उपलबध करुन देण्यात येईल सक्षमपणे आयुक्तालयाचे कामकाज सुरु केले जाईल.अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
वसई विरार व मीरा भाईंदर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी या आयुक्तालयाद्वारे मदत होईल असा विश्वास पालघरचे पालकमंत्री तथा कृषिमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला.
मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर सागरी सुरक्षेला प्राधान्य देऊन पुढील कामाची दिशा ठरवावी लागणार आहे.आगामी काळात आयुक्तालय सक्षम करण्यावर निश्चित भर देण्यात येईल अशी ग्वाही गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
पोलिस महासंचालक सुबोध जायसवाल यांनी प्रास्तविक केले.
आभार प्रदर्शन करतांना पोलिस आयुक्त सदानंद दाते यांनी आयुक्तालय गतिमान, संवेदनशील आणि कर्तव्यनिष्ठ पध्दतीने काम करेल अशी ग्वाही दिली.
पोलिस आयुक्तालयाविषयी
पोलीस आयुक्तालयात मीरा-भाईंदरमधील 6 आणि वसई- विरार मधील 7 अशी एकूण 13 पोलीस ठाणी आहेत. याशिवाय मीरा-भाईंदरमध्ये खारीगाव आणि काशिगाव अशी 2 तर वसई- विरारमध्ये पेल्हार, आचोळे, मांडवी, बोळिंज व नायगाव अशी 5 नवीन पोलीस ठाणी होणार आहेत. आयुक्तालयात 5 डीसीपी असणार आहेत. तर मीरा-भाईंदरमध्ये 1 व वसई-विरारमध्ये 2 झोन केले जाणार आहेत.
या ऑनलाईन सोहळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, पालघरचे पालकमंत्री दादाजी भुसे, गृह (शहर) राज्यमंत्री, सतेज पाटील, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभुराज देसाई, अपर मुख्य सचिव (गृह) सीताराम कुंटे, पोलीस महासंचालक, सुबोधकुमार जायस्वाल, मीरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्त सदानंद दाते यांसह ठाणे पालघर जिल्ह्यातील खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी यांसह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.