‘एनएचएआय’ला टीओटीअंतर्गत 9 टोल नाक्यांवरील प्रत्यक्ष वसुलीच्या बदल्यात 5,011 कोटी रूपयांचा महसूल


नवी दिल्‍ली : एनएचएआय म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरू केलेल्या ‘टीओटी’म्हणजे टोल- ऑपरेट- ट्रान्सफर या महत्वाकांक्षी योजनेनुसार 566 किलोमीटर लांबीच्या 9 टोलनाक्यांवर प्रत्यक्ष वसूल टोलच्या बदल्यात 5,011कोटी रूपये आज मिळाले. मेसर्स क्यूब मोबिलिटी इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड (क्यूब हायवे) या कंपनीकडे टोल जमा करण्याचे काम सोपविण्यात आले आहे. हे 9 टोलनाके उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार आणि तामिळनाडू या राज्यांमधले आहेत. ही रक्कम एनएचएआयकडे सोपविण्याचा कार्यक्रम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी होते. यावेळी रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री जनरल व्ही.के.सिंग आणि एनएचएआयचे अध्यक्ष एस एस संधू, एनएचएआयचे सदस्य आणि क्यूब हायवेचे प्रतिनिधी उपस्थित होते.


टोल वसुली करारानुसार 30 वर्षांचा सवलतीचा कालावधी आहे. या सवलतीच्या काळामध्ये टोल नाका चालवणे, देखभाल करणे आणि टोल जमा करण्याचे काम देण्यात आले आहे. या टीओटी योजनेअंतर्गत अशा प्रकारे  9 टोलनाक्यांचे काम सोपविण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 681 किलोमीटर लांबीच्या महामार्गावरील एकूण 10 टोलनाक्यांचे काम मेसर्स एमएआयएफ यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. त्याबदल्यामध्‍ये सरकारला 2018 मध्ये 9,681.5 कोटी रूपये महसूल मिळाला आहे. टीओटी या माध्यमातून एनएचआयए आणखी काही टोलनाक्यांचे काम सोपविण्यासाठी प्रक्रिया पार पाडत आहे.