लोकहिताचे निर्णय संकेतस्थळाच्या माध्यमातून गतीने पोहचतील – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील
• महेश आनंदा लोंढे
पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या नवीन संकेतस्थळाचे लोकार्पण
मुंबई : मंत्रालयस्तरीय पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या रौप्य महोत्सवी वर्षात विभागाच्या संकेतस्थळाला नवीन रूप देण्यात आले असून पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज या संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात आले. मंत्रालयातून या विभागाशी संबंधित घेण्यात येणारे लोकहिताचे निर्णय संकेतस्थळाच्या माध्यमातून गतीने जनतेपर्यंत पोहचतील, असा विश्वास मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
‘जल जीवन मिशन’च्या अभियान संचालक श्रीमती आर. विमला, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे विशेष कार्य अधिकारी चंद्रकांत गजभिये, कक्ष अधिकारी श्रीमती सरोज देशपांडे, अधीक्षक अभियंता प्रशांत भामरे, श्री. नंदनवरे आदी यावेळी उपस्थित होते.
राज्यातील ग्रामीण भागात स्वच्छ पिण्याच्या पाणीपुरवठा करणे, त्यासंबंधी धोरणात्मक निर्णय घेणे, अंमलबजावणी करणे तसेच ग्रामीण भागातील नागरिकांच्या वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छते संबंधित कामकाज विभागाद्वारे हाताळण्यात येते. या कामांची माहिती सुलभतेने नागरिकांपर्यंत पोहचवावी यासाठी https://water.maharashtra.gov.in ही नवीन रुप देण्यात आलेली वेबसाईट कार्यरत असेल. मंत्रालयातील मुख्यालयात घेण्यात येणारे नागरिकांच्या हितांचे निर्णय नागरिकांपर्यंत तसेच अंमलबजावणी यंत्रणेपर्यंत त्वरेने पोहोचणे गरजेचे असते.
राज्य शासनाचे महत्त्वाकांक्षी ‘जल जीवन मिशन’ आणि ‘स्वच्छ भारत मिशन’ या प्रकल्पांची सद्यस्थिती दर्शविणारे डॅशबोर्ड या वेबसाईटमध्ये उपलब्ध करण्यात आले आहेत. याद्वारे राज्यातील जिल्ह्यांची कामाची प्रगती व अद्ययावत (रिअल टाईम) सद्यस्थिती समजू शकणार आहे. तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील सर्व योजनांची माहिती, शासन निर्णय एका क्लिक वर उपलब्ध होऊ शकते. विभागातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे संपर्क आणि ई-मेल आयडी या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आली असून त्यामुळे नागरिकांना विभागाशी संबंधित कामासाठी योग्य ठिकाणी संपर्क साधणे शक्य होईल. ही वेबसाईट सर्वस्तरावरील नागरिकांना वापरण्यास सोपी विशेषतः दिव्यांगस्नेही करण्यात आली आहे.
या संकेतस्थळाच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण काम केल्याबद्दल श्रीमती सुवर्णा वाघ, विजय बेलूरकर, श्रीमती जेसिका बर्नाड यांचा मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.