केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री राम विलास पासवान  यांचं काल संध्याकाळी दिल्लीत निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्यावर नुकतीच हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली होती, मात्र उपचारा दरम्यान रुग्णालयातच त्यांचं निधन झालं.

लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक असलेले पासवान, बिहार मधील  हाजीपुर लोकसभा मतदार संघातून ते सलग आठ वेळा, प्रचंड बहुमताने  निवडून आले होते. दिवंगत पासवान यांच्या सन्मानार्थ दिल्ली तसेच राज्यांच्या तसंच केंद्र शासित प्रदेशांच्या राजधान्यांमध्ये राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येईल.

पासवान यांचं पार्थिव शरीर आज सकाळी नवी दिल्लीतील जनपथ येथील निवासस्थानी नेण्यात येणार असून, दुपारच्या सुमारास ते पाटण्याला पक्षाच्या कार्यालयात नेण्यात येईल.उद्या पाटणा  इथेच त्यांच्या पार्थिव शरीरावर, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. 

सध्या पासवान यांचा पार्थिव देह अंत्यदर्शनासाठी त्यांच्या नवी दिल्लीतल्या निवास स्थानी ठेवला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, प्रधाननंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ नेते शरद पवार, भाजपा अध्यक्ष जे पी नडडा यांनी आज सकाळी पासवान यांचं अंत्यदर्शन घेतलं.