तिसऱ्या राष्ट्रीय पोषण महिन्यानिमित्त, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नागरिकांना कुपोषण-मुक्त भारतासाठी प्रतिज्ञा घेण्याचे आणि योगदान देण्याचे आवाहन


बालकं, गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांना पुरेसे पोषण देणे, याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्राधान्य


नवी दिल्‍ली : तिसऱ्या राष्ट्रीय पोषण महिन्यानिमित्त, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नागरिकांना कुपोषण-मुक्त भारत करण्यासाठी प्रतिज्ञा करण्याचे आणि योगदान देण्याचे आवाहन केले आहे. ट्वीट संदेशात ते म्हणाले, “बालकं, गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांना पुरेसे पोषण मिळावे याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्राधान्य आहे.


पंतप्रधानांच्या हस्ते 2018 मध्ये सुरु करण्यात आलेल्या, पोषण अभियानाची देशाला कुपोषणातून मुक्त करण्यात अतिशय महत्त्वाची भूमिका आहे, असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले.


अमित शाह म्हणाले, 2020 मधील सध्याच्या पोषणमहिन्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार तीव्र कुपोषणाने ग्रस्त असलेल्या मुलांच्या समग्र पोषणासाठी देशभरात व्यापक अभियान राबवणार आहे.


या अभियानाला अधिक मजबूती देण्यासाठी, सर्वांनी कुपोषण-मुक्त भारत करण्याची प्रतिज्ञा घेऊ आणि योगदान देऊ, असे ते म्हणाले.


राष्ट्रीय पोषण माह सप्टेंबर महिन्यात साजरा करण्यात येणार आहे. जनसहभागातून बालकं, महिला यांच्यातील कुपोषणाची समस्या सोडवणे आणि सर्वांना आरोग्य आणि पोषण सुनिश्चित करणे हे पोषण महिन्याचे उद्दिष्ट आहे.