महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा सुधारित वेळापत्रक जाहीरनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एप्रिल आणि मे २०२० मध्ये होणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पुढे ढकलण्यात आलेल्या तीन परीक्षांचं सुधारित वेळापत्रक आयोगानं जाहीर केलं आहे. त्यानुसार यापूर्वी जाहीर वेळापत्रकानुसार येत्या २० सप्टेंबर रोजी होणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा ११ ऑक्टोबर २०२० रोजी, तर ११ ऑक्टोबर रोजी होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा राजपत्रित गट ‘ब’ संयुक्त पूर्व परीक्षा २२ नोव्हेम्बर २०२० रोजी होणार आहे. 


येत्या १ नोव्हेम्बरची महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा मात्र आपल्या   निर्धारित तारखेलाच होणार असल्याचं आयोगानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. 


कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरता तसंच उमेदवार आणि परीक्षा आयोजित करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं आयोगानं उपाययोजना केल्या आहेत. कोरोनाबाबतच्या परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षेच्या आयोजनाबाबतची  माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध केली जाईल. या माहितीवर उमेदवारांनी लक्ष ठेवावं, असं आवाहन आयोगानं केलं आहे.