प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाच्या वतीनं राज्यसह देशभरात आज विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजननवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा आज सत्तरावा वाढदिवस आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू तसंच केंद्रीय मंत्री, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी  विविध राजकीय पक्षांचे नेते, देश विदेशातल्या नेत्यांनी पंतप्रधानांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.


भारतीय जनता पक्षातर्फे त्यांचा वाढदिवस सेवा दिवस म्हणून साजरा केला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मोदी यांना आरोग्यदायी आणि आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निरोगी दिर्घायुष्य लाभो अशा शब्दात उपमुख्य मंत्री अजित पवार यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. स्वतंत्र भारतात जन्म झालेले आपण देशाचे पहिले प्रधानमंत्री आहात. आपली प्रधानमंत्रीपदी झालेली निवड ही आपल्यावरील देशवासियांच्या दृढ विश्वासाचं प्रतिक आहे, असंही पवार यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.राज्यातही आज प्रदेश भाजपच्या वतीनं विविध उपक्रमाने सेवा दिवस साजरा करण्यात येत आहे. नागपूर जिल्हा भाजपाच्या वतीनं यानिमित्त नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. 


नाशिक जिल्ह्यात मनमाड इथं वृक्षारोपण तसंच क्रीडा साहित्याचं वाटप या निमित्तानं करण्यात आलं. पेठ इथल्या कोविड सेटंरला स्टीमर मशीन खासदार भारतीताई पवार यांच्या उपस्थितीत भेट देण्यात आलं. उस्मानाबाद तंसच अमरावती इथंही वृक्षारोपण, स्वच्छता अभियान तसंच सफाई कर्मचाऱ्यांना फळ वाटप करुन सेवा सप्ताहाला सुरुवात झाली आहे. 


वाशिम जिल्ह्यातही स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. धुळे शहरात भाजपाच्या वतीनं सेवा दिवसानिमित्त कोरोनामुक्त धुळे अभियान राबवण्यात आला. त्यात आरोग्य तपासणी करण्यात आली.