कांदा निर्यातबंदी रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यात आज सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन


मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिकमध्ये कांदा निर्यातबंदीच्या निषेधार्थ आज सलग तिसऱ्या दिवशी आंदोलनं करण्यात आलं. निफाड तालुक्यात विंचुर इथं रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आज बंदरावर निर्यातीसाठी चारशे कंटेनर थांबलेले आहेत, तर सहाशे पेक्षा जास्त ट्रक बांग्लादेश सीमेवर आहे.

कांदा निर्यात झाला नाही तर शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे. येत्या २३ तारखेपासून जे खासदार शेतकऱ्यांच्या बाजूनं उभे राहणार नाहीत त्यांच्या घरासमोर रयत क्रांती संघटना निदर्शनं करेल, असा इशारा खोत यांनी दिला. 


दरम्यान, सिन्नर इथं राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तहसीलदारांना कांद्याच्या माळा घालून आंदोलन केलं तर येवला इथं प्रहार संघटनेच्या वतीनं मुंडन आंदोलन करण्यात आलं.


बुलडाणा जिल्ह्यात कांदा निर्यात बंदी विरोधात खामगाव, शेगाव, जळगाव जामोदसह अनेक ठिकाणी किसान सभेच्या वतीनं शेतकऱ्यांनी रस्त्यावर  आंदोलन केलं. यावेळी शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदा फेकून निषेध व्यक्त केला.


सांगलीमध्ये कांदा निर्यात तसंच बेरोजगारी विरोधात युवक काँग्रेसनं ठिय्या आंदोलन केलं.