कोरोनावर मात करून विधानसभा अध्यक्ष नाना पटोले लोकसेवेच्या कार्यासाठी सज्ज


मुंबई : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले कोरोना आजारावर मात करून नेहमीच्या उत्साहात विधानभवन येथे आपल्या कार्यालयात आले.


दि. 7 व 8 सप्टेंबर, रोजी झालेल्या पावसाळी अधिवेशनाआधी त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे चाचणीमध्ये आढळून आले होते. त्यामुळे त्यांनी मुंबईतील आपल्या निवासस्थानी स्वत:चे विलगीकरण करून उपचार घेतले. उपचारानंतर त्यांची कोरोना आरटी-पीसीआर चाचणी नकारात्मक (निगेटिव्ह) आल्यावर ते लोकसेवेच्या कार्यासाठी नेहमीच्या जोमाने आणि उत्साहाने पुन्हा सज्ज झाले.


त्यांनी गडचिरोलीतील महाविद्यालयास अनुदान उपलब्ध करून देण्यासंदर्भातील बैठक, विधानभवनातील दैनंदिन कामकाज तसेच मान्यवरांच्या गाठीभेटी घेतल्या. आपण लवकर बरे व्हावे यासाठी सदिच्छा व्यक्त करणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले आहेत.