अंतराळ आधारित माहिती पुरवणारे 32 पृथ्वी निरीक्षण संवेदक सध्या कक्षेत


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अद्ययावत क्षमतेचे  32 पृथ्वी निरीक्षण  संवेदक सध्या कक्षेत असून अंतराळ आधारित माहिती  पुरवत असल्याचे केंद्रीय अणू उर्जा आणि अंतराळ राज्य मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज राज्य सभेत एका लेखी उत्तरात सांगितले.  जानेवारी 2018 पासून पाच पृथ्वी निरीक्षण उपग्रह आणि पाच दळणवळण पेलोड काम करत आहेत. जानेवारी 2020 पासून पूर,चक्रीवादळे, जंगलातली आग यासारख्या सर्व महत्वाच्या आपत्ती बाबत माहिती सहाय्य पुरवण्यात आले.


एप्रिल 2020 पासून वापरकर्त्यांना सुमारे 2,51,000 मूल्यवर्धित डाटा उत्पादने पुरवण्यात आली. हवामान शास्त्र, समुद्र विज्ञान आणि भू  रिमोट सेन्सिंग उपग्रहामार्फत मिळालेल्या डाटाचा वापर करत भौगोलिक आणि रिमोट सेन्सिंग डाटा उत्पादनांचा या मूल्य वर्धित उत्पादनात समावेश आहे.  इस्रोकडून प्रक्षेपित करण्यात आलेले आणि कार्यरत राहण्याचा काळ संपल्यामुळे  कार्यरत नसलेले 47 उपग्रह सध्या कक्षेत आहेत अशी माहिती देण्यात आली आहे.