राज्यात ठीकठिकाणी गणेशमूर्तींचं विसर्जन सुरु


मुंबई (वृत्तसंस्था) : अकरा दिवसांच्या गणेशोत्सवाची आज सांगता होत असून, मुंबईसह राज्यात ठीकठिकाणी गणेशमूर्तींचं विसर्जन सुरु आहे. मुंबईत विसर्जन सुरळीत पार पाडण्यासाठी ३५ हजाराहून अधिक पोलीस बंदोबस्तासाठी तैनात केले आहेत. 


मुंबईत सव्वा लाख घरगुती आणि दहा हजार सार्वजनिक गणरायाच्या छोट्या मूर्तींची प्रतिष्ठापना झाली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा उत्सव साध्या पद्धतीने साजरा झाला. मुंबईतील चौपाट्या आणि कृत्रिम तलावात विसर्जनाला सुरुवात झाली आहे. आपल्या लाडक्या दैवताला पुढच्या वर्षी लवकर या अशी आर्त साद घालत भाविक गणरायाला निरोप देत आहेत. सुमारे ५ हजार सीसी कॅमेऱ्यांच्या माध्यमातून विसर्जनावर नजर ठेवली जात आहेत.


पुण्यातील मानाच्या गणेश मंडळाच्या गणेश मूर्तीचं विसर्जन मंडपाजवळ तय्यार केलेल्या हौदातच होत आहे. कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विसर्जनासाठी गर्दी टाळण्याकरता ठीकठिकाणी स्थानिक प्रशासनानं विशेष व्यवस्था केली आहे.


नाशिक महापालिकेनं गणेश विसर्जनासाठी गोदावरी, नासर्दी, वाघाडी आणि वालदेवी नदीकाठी ३३ अधिकृत विसर्जन स्थळं तयार केली आहेत, तर विविध प्रभागांमध्ये खुल्या जागांवर ३३ कृत्रिम कुंडं तयार केले आहेत. शहरातल्या स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनं तसंच महापालिकेच्या वतीनं मूर्ती स्वीकारल्या जात असून आतापर्यंत पाच हजाराहून अधिक मोठ्या मूर्तीं संकलित झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.


गणेश विसर्जनासाठी नदीकाठी गर्दी करण्याऐवजी पूर्व नियोजित वेळेनुसार जाऊन विसर्जन करण्यासाठी नाशिक महापालिकेनं मिशन विघ्नहर्ता अंतर्गत लिंक उपलब्ध करुन दिली आहे त्यावर अगोदरच टाइम्स स्लॉट बुकिंग केल्यानंतर ठराविक वेळेस गेलेल्या नागरिकांसाठी स्वतंत्र लेन उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी महापालिकेने हा अभिनव उपक्रम राबवला आहे या उपक्रमाला नाशिककरांनी प्रतिसाद चांगला प्रतिसाद दिला असून तीन हजार नागरिकांनी अशाप्रकारे टाइम्स'ला बुकिंगचा लाभ घेतला आहे.


धुळे शहरात ३७ ठिकाणी गणपती विसर्जनासाठी पाण्याच्या टाक्या ठेवल्या आहेत. महापालिकेचे कर्मचारीही गणेशमूर्ती संकलित करुन त्यांचं विसर्जन करत आहेत.


सातारा जिल्ह्यातही सार्वजनिक तसेच घरगुती गणेश विसर्जनाला सुरुवात झाली आहे.


रत्नागिरी जिल्ह्यात आज अनंत चतुर्दशीला ३६ हजार ७३० घरगुती आणि ५१ सार्वजनिक गणेशमूर्तींचं विसर्जन होत आहे. आज कोणत्याही ठिकाणी विसर्जनाच्या मिरवणुका निघणार नाहीत. रत्नागिरी, चिपळूण, खेड आणि दापोली इथं नगरपालिकांनी गणेशमूर्तींच्या संकलनाची केंद्रं सुरू केली आहेत. ग्रामीण भागात मात्र तलाव, नद्या आणि समुद्रावरच विसर्जन केलं जाणार आहे. त्यासाठी पोलिसांनी चोख व्यवस्था ठेवली आहे.


रायगड जिल्ह्यात अलिबागसह सर्वत्र गणरायाला आज निरोप दिला जात आहे. जिल्हयात 144 सार्वजनिक आणि 13 हजार 848 घरगुती गणेश मूर्तींचे आज विसर्जन होत आहे. कोरोनामुळे आज मिरवणुका नाहीत, वाद्य नाहीत अत्यंत साध्या पध्दतीनं गणरायांना निरोप दिला जात आहे. विसर्जनासाठी नगरपालिका तसंच प्रशासनानं सर्व व्यवस्था केली आहे.


औरंगाबाद शहरात २५ ठिकाणी मूर्ती संकलन करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे, तर अकरा ठिकाणी थेट विसर्जनाची व्यवस्था केली आहे. नागरिकांना थेट विसर्जन विहिरींवर जायला मनाई केली आहे.


जालना शहरातल्या प्रत्येक प्रभागातून नगरपालिकेच्या वाहनातून सार्वजनिक आणि घरगुती गणेशमूर्तींचं संकलन केलं जाणार असून मोती तलावात विसर्जन केलं जाणार आहे. मोती तलाव परिसरात नागरिकांना यायला मनाई असून या भागात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. 


अमरावती जिल्ह्यात गणेश विसर्जनाला सुरुवात झाली असून छत्री तलाव आणि वडाळी तलाव इथं अनेकांनी गणेश मूर्तीचे विसर्जन केलं आहे. शहरात मुख्य चौकाचौकात प्रमुख ठिकाणी कृत्रिम तलाव तयार करून गणेश विसर्जन सुरू आहे. आज सकाळपासूनच गर्दी सुरू आहे. प्रशासनानं शहरात १० ठिकाणी गणेश विसर्जनाची सुविधा निर्माण केली आहे.