स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राज्याची कामगिरी कौतुकास्पद
• महेश आनंदा लोंढे
नियमित प्रत्यक्ष भेटी देऊन स्वच्छता प्रकल्पांची उपयोगिता व गुणवत्ता तपासावी - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे प्रशासनास निर्देश
मुंबई : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महाराष्ट्राने चांगली कामगिरी बजावली असून शहरी व ग्रामीण भागात स्वच्छतेसंदर्भात जी कामे केली जात आहेत त्याच्या प्रगतीसंदर्भात वेळोवेळी अचानक भेटी देऊन त्या कामांची गुणवत्ता व उपयोगितता तपासावी, असे निर्देश राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी प्रशासनाला दिले.
राजभवन येथे आयोजित ग्रामीण व शहरी हागणदारीमुक्त अभियानाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव एम.डी. पाठक, स्वच्छ भारत मिशनच्या (शहरी) कार्यकारी संचालक सीमा ढमढेरे आदी अधिकारी उपस्थित होते.
राज्यपाल श्री.कोश्यारी पुढे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मोठी चळवळ उभारली. त्यामुळे स्वच्छतेविषयी मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाली. राज्य शासनाने हागणदारीमुक्तीच्या दृष्टीने शहरी व ग्रामीण भागात चांगली कामगिरी केली आहे. ओला व सुका कचऱ्याचे व्यवस्थापन व पुर्नप्रक्रिया या बाबतीतही राज्याने भरीव कामगिरी केली आहे. मात्र सार्वजनिक व घरघुती शौचालयांचा प्रत्यक्षात वापर होतो का, त्याची देखभालदुरूस्ती, पुर्नप्रक्रिया केलेला बायोगॅस, कम्पोस्ट खताचा वापर कसा व किती प्रभावीपणे केला जातो आदी बाबींची विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन शहानिशा करावी, असे निर्देश त्यांनी प्रशासनास दिले. आपण स्वत: अशा भेटी देणार असल्याचेही राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी सांगितले. दरम्यान अपर मुख्य सचिव श्री. चहांदे यांनी ग्रामीणची तर प्रधान सचिव श्री. पाठक यांनी शहरी भागाची सादरीकरणाच्या माध्यमातून राज्यपालांना स्वच्छता, शौचालये, घनकचरा व्यवस्थापन, पुर्नप्रक्रियेबाबत राज्याने केलेल्या प्रगतीची माहिती करून दिली.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.