कोकणात सावित्री, कुंडलिका आणि जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : पालघर जिल्ह्यात आज सकाळपासून बोईसर, धनानीनगर, पालघर , सातपाटी, डहाणू, बोर्डी, चिखले, विक्रमगड, वसई - विरार, नालासोपारा या भागांत पावसानं जोरदार वाऱ्यांसह हजेरी लावली आहे. तर वाडा, जव्हार या भागांत अधून मधून रिमझिम पाऊस होत आहे. सकाळपासून मुसळधार होतं असल्यानं नाले आदी भरून वाहत असून अनेक ठिकाणच्या सखल भागांत रस्त्यांवर पाणी साचलं आहे. वसई आणि विरार इथं रस्त्यावर झाड उन्मळून पडण्याच्या घटना झाल्या आहेत. दोन महिन्यानंतर काल पासून पावसानं जिल्ह्यातल्या अनेक भागांत चांगली हजेरी लावली आहे. त्यामुळे चिंतेत आलेल्या बळीराजाही सुखावला आहे.
रायगड जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. आता पावसाचा जोर कमी झाला असला तरी जिल्ह्यातल्या सावित्री, आंबा, कुंडलिका, पाताळगंगा, उल्हास या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. सावित्री आणि कुंडलिका नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. सावित्री नदीच्या आसपासच्या परिसरातील नागरिकांना जिल्हा प्रशासनानं सतर्कतेचा दिला आहे. पुढच्या ४८ तासात रायगडसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली असून रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. रत्नागिरी तालुक्यातल्या काजळी नदीला आलेल्या पुरामुळे चांदेराई बाजारपेठेत पाणी भरलं, त्यामुळे व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातल्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं असून अनेक भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, रत्नागिरी जिल्हातल्या खेड इथल्या जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालपासून पावसान जोर धरलाय. जिल्ह्यात सगळीकडेच मुसळधार पाऊस पडतोय. काल रात्री पासून पावसाचा आणि वाऱ्याचा जोर वाढला आहे. त्यामुळे पडझडीच्या घटना झाल्या आहेत. सखल भागात पाणी साचलं आहे. झाडं पडून काही ठिकाणचा वीज पुरवठा खंडित आहे. रस्त्यावर झाड पडल्यानं वाहतुकसुद्धा ठप्प झाली आहे. सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात ११२ मिलीमीटर च्या सरासरीने ८९९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस सावंतवाडी तालुक्यात १४० मिलिमीटर एवढा पडला. जिल्ह्यात दोडामार्ग, वेंगुर्ले, कुडाळ या तालुक्यात पावसानं गेल्या २४ तासात शंभरी ओलांडली. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण २ हजार ८१० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
सातारा जिल्ह्याच्या विविध भागात रात्री पासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.
सांगली जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही विभागात हा पाऊस कोसळत आहे. सांगली जिल्ह्यातल्या चांदोली परिसरात अतिवृष्टी झाली. गेल्या 24 तासात इथ 70 मिलिमिटर पाऊसाची नोंद झाली. चांदोली इथली वीज निर्मिती पूर्णतः बंद आहे. त्यामुळे नदी पात्रात पाण्याचा विसर्ग ही बंद आहे. गेली पंधरा दिवस पावसानं ओढ दिल्यानं खरीप पिकांना धोका निर्माण झाला होता. मात्र आज सकाळपासून पावसानं दमदार सुरुवात केली. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.