राज्यात कोविडची दूसरी लाट येऊ देणार नाही असा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्धारनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात कोविडची दूसरी लाट येऊ देणार नाही असं प्रतिपादन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. आपलं सरकार यासाठी प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.


ते आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या बरोबर झालेल्या १० राज्यांच्या कोरोनास्थितीच्या आढावा बैठकीत बोलत होते. मुंबईसह राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये साथरोग नियंत्रण रुग्णालयं सुरू करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक सह दहा राज्यांच्या कोरोनास्थितीचा व्हिडीओ कॉन्फरसिंग द्वारे घेतलेल्या बैठकीत आढावा घेतला. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथसिंह, अर्थमंत्री निर्मला सितारामन, आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांच्यासह राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि मुख्य सचिव संजय कुमार त्याचबरोबर विवध राज्यांचे मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव उपस्थित होते.

कोरोनातून बरे झालेल्यांना इतर आजार झाल्याचं दिसून येत असून त्यांच्या उपचारासाठी यंत्रणा निर्माण करणायाची गरज असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. वैद्यकीय शिक्षणाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षांबाबत निर्णय घेण्याची गरज असल्याचंही ते यावेळी म्हणाले. 


कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर १ टक्क्यापेक्षा कमी करण्याचं उद्दीष्ट असल्याचं यावेळी प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. देशातले ८० टक्के कोरोनारुग्ण हे या दहा राज्यातले असून या राज्यांमध्ये जर आपण कोरोनावर विजय मिळवू शकलो तर तो देशाचा कोरोनावरचा विजय असेल असं मत मोदी यांनी यावेळी व्यक्त केलं. कोविड १९ विरोधातली लढाई सामूहिक प्रयत्नांमधूनच जिंकता येईल, असं ते म्हणाले.

कोरोनाबाबत लोकांच्या मनातली भीती दूर होत असून त्यांचा आत्मविश्वास वाढत आहे, ही गोष्ट महत्वाची असल्याचं ते म्हणाले. देशातल्या कोविड ऍक्टिव्ह रुग्णांची टक्केवारी  कमी झाली असून रुग्ण  बरे होण्याचं प्रमाण वाढलं आहे, यावरुन, कोविड-19 ला आळा घालण्याच्या उपाययोजना परिणानकारक आहेत, हेच सिद्ध होत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.