संयुक्त अरब अमिरातीच्या यानाची मंगळाकडे झेप


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संयुक्त अरब अमिरातीचे अवकाशयान सोमवारी मंगळाच्या दिशेने झेपावले. ‘अल अमल’ असे या अवकाशयानाचे नाव असून ते जपानच्या प्रक्षेपण तळावरून सोडण्यात आले. अरब जगतातील कुठल्याही देशाने आतापर्यंत अशी आंतरग्रहीय मोहीम राबवली नव्हती.


‘अल अमल’ याचा अर्थ ‘आशा’ असा आहे. हे यान १.३ टन वजनाचे असून ते जपानमधील तानेंगिशिमा येथील अवकाशतळावरून स्थानिक वेळेनुसार पहाटे १.५८ वाजता सोडण्यात आले. यानाची दूरसंचार यंत्रणा कार्यान्वित केली असून त्याच्याकडून पहिले संदेश मिळाले आहेत. त्याच्या सौरपट्टय़ा उघडण्यात आल्या असून मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीज प्रक्षेपण सेवेने यान प्रक्षेपित केले आहे. दुबईच्या अल खवानीज केंद्राला यानाकडून संदेश प्राप्त झाले आहेत. सौरपपट्टय़ा विद्युत भारित झाल्याने अवकाशयान ४९ कोटी ५० लाख कि. मी. चे मंगळापर्यंतचे अंतर पार करणार आहे.


संयुक्तअरब अमिरातीचे डिजिटल अर्थव्यवस्था मंत्री ओमर सुलतान अल ओलामा यांनी सांगितले की, या प्रकल्पात कोविड १९ चा मोठा अडथळा होता. त्यावर मात करण्यात यश आले आहे. सर्व सामग्री जपानमध्ये प्रक्षेपणापूर्वी पाठवणे गरजेचे होते. २०० दशलक्ष डॉलर्सचा हा प्रकल्प असून अरब जगतातील आंतरग्रहीय योजना पहिल्यांदाच यशस्वी झाली आहे. या मोहिमेसाठी अमिरातीच्या १३५ अभियंत्यांनी सहा वर्षे परिश्रम केले होते. हे अवकाशयान फेब्रुवारी २०२१ मध्ये मंगळावर पोहोचणार असून त्यावेळी अमिरातीच्या स्थापनेचा पन्नासावा वर्धापन दिन आहे.