ऑटोमोबाईल उद्योगक्षेत्रासाठी अप्रेन्टिस योजना अधिक फायदेशीर : मुख्य कार्यकारी अधिकारी एएसडीसी अरिंदम लाहिरी 


पुणे : अप्रेन्टिस योजना देशातील वाहन उद्योगासाठी अधिक लाभदायक असुन या योजनेमुळे उद्योगजगताला आवश्यक  असलेले कुशल मनुष्यबळ सहजगत्या उपलब्ध  होते, तसेच बेरोजगार युवकांना रोजगार संधी प्राप्त होते असे मत केंद्र  सरकारच्या ऑटोमोटिव्ह स्किल डेव्हलपमेंट कौन्सिलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरिंदम लाहिरी यांनी व्यक्त केले. ते आज (शनिवारी) 'यशस्वी' संस्थेच्यावतीने आयोजित ‘भारतातील वाहन उद्योगासाठी अप्रेन्टिस योजना’ या विषयावरील वेबिनारमध्ये बोलत होते. 


यावेळी बोलताना ते म्हणाले की, अप्रेन्टिस योजनेची संपूर्ण कार्यवाही पोर्टलद्वारे होत असल्याने पारदर्शकता पाळली जात असून यामुळे दप्तर दिरंगाईलासुद्धा आळा बसला आहे. या परिसंवादात बोलताना एप्रेन्टिस एनएसडीसीचे माजी प्रमुख  सुरजित रॉय यांनी सांगितले की, जगातील अन्य देशांच्या तुलनेत भारतातील उद्योगक्षेत्रातील अप्रेन्टिसची संख्या खूपच अत्यल्प असून ही संख्या वाढवण्यासाठी उद्योगक्षेत्राने पुढाकार घेण्याची गरज आहे असे सांगितले. तर भारत फोर्ज कंपनीच्या मनुष्यबळ व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. एस. व्ही भावे यांनी या परिसंवादात बोलताना सांगितले की, अप्रेन्टिस योजनेमुळे उद्योगक्षेत्राला त्यांच्याच कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या अप्रेंटिसच्या माध्यमातून भविष्यासाठी आवश्यक असलेले दीर्घकालीन टिकू शकणारे कुशल मनुष्यबळ तयार करण्याची संधी मिळते. 


तसेच रिनॉल्ट निसान ऑटोमोटिव्ह इंडिया प्रा. लि. चे मनुष्यबळ व्यवस्थापन विभागाचे उपाध्यक्ष दुष्यन्तकुमार टी. आर यांनीही त्यांच्या मनोगतातून अप्रेन्टिस योजनेचे फायदे स्पष्ट करताना या योजनेमुळे जपान मधील कंपनीसाठीही आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून दिल्याचा अनुभव विशद केला. याशिवाय व्हॉल्व्हो आयशर कर्मशियल व्हेईकल्स  लि. कंपनीचे मनुष्यबळ व्यवस्थापन विभागाचे उपाध्यक्ष  सुदीप देव यांनी त्यांच्या मनोगतात सांगितले कि, वाहन उद्योग व्ही सिक्स तंत्रज्ञानाकडे वाटचाल करत असताना या उद्योगक्षेत्राला अत्यावश्यक असलेल्या कुशल मनुष्यबळाची गरज अप्रेन्टिस योजनेतून निश्चितच पूर्ण होऊ शकते हा आत्मविश्वास व्यक्त केला. 


तर या परिसंवादात बोलताना यशस्वी संस्थेचे अध्यक्ष तथा नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंटचे राष्ट्रीय अध्यक्ष  विश्वेश कुलकर्णी यांनी टीपीए संकल्पना व अप्रेन्टिस योजनेची अंमलबजावणी याबाबत सविस्तर माहिती सांगत उद्योगजगताने अप्रेंटिसची नियुक्ती करताना त्यांच्या प्रशिक्षणावर भर द्यावा असे आवाहन केले. 


या परिसंवादासाठी विविध कंपन्यांच्या दोनशे सत्तरहुन अधिक मनुष्यबळ व्यवस्थापकांनी सहभाग नोंदवला, तर वेबिनारचे समन्वयक म्हणून  सुनील नेवे यांनी  काम पाहिले.