वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्यभरात विशेष शिबिरांचे आयोजन करा – ऊर्जामंत्री
• महेश आनंदा लोंढे
मुंबई : वीज ग्राहकांच्या बिल विषयक तक्रारी सोडविण्यासाठी राज्यभरात विशेष शिबिरांचे आयोजन करावे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींशी संपर्क साधून शंकेचे प्राधान्याने निवारण करण्याचे स्पष्ट निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी प्रधान सचिव (ऊर्जा) दिनेश वाघमारे आणि महावितरणचे संचालक(संचलन) दिनेशचंद्र साबू यांना दिले.
लॉकडाउनच्या काळातील एकत्रित वीज बिलामुळे ग्राहकांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे. हा संभ्रम तातडीने दूर करण्यासाठी डॉ. राऊत यांनी सदर कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. महावितरणच्या https://billcal.mahadiscom.in/consumerbill या लिंकवर ग्राहकांनी वीज बिल तपासून घ्यावे आणि शंका असल्यास नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून समस्येचे निवारण करावे असे आवाहन ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी केले आहे. महावितरण वीज ग्राहकांचे समाधान करण्यास कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
यासोबतच, ग्रामीण व शहरी भागातील लोकप्रिनिधी, प्रतिष्ठित नागरिक आणि पत्रकारांचा सर्वसमावेशक स्वतंत्र व्हॉट्सएप ग्रुप उप विभागीय अधिकारी स्तरावर तयार करून त्यावर वीज बिलाची संपूर्ण माहिती देऊन वीज विषयक समस्या/शंकांचे संपूर्ण समाधान करावे, त्यांचे सोबत वेबिनार आयोजित करून संवाद साधावा असे त्यांनी सुचविले.
“शासन आपल्या दारी” या संकल्पनेनुसार, शहरी भागात महत्त्वाच्या/मोक्याच्या ठिकाणी तर ग्रामीण भागात आठवडी बाजाराच्या दिवशी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने बाजाराकरिता येत असतात, तेथील नजीकच्या हॉल/कार्यालयात सामाजिक अंतराचे पालन करून विशेष शिबीरे/ग्राहक मेळावे घेऊन वीज ग्राहकांचे समाधान करावे, तसेच तक्रारींचे निरसन करण्याच्या दृष्टीने केलेल्या उपाययोजनांबाबत विविध प्रसारमाध्यमे, सोशल मिडियाच्या माध्यमातून व्यापक प्रसिद्धी देण्याच्या सूचना ऊर्जामंत्र्यांनी दिल्या आहेत.
महावितरण मुख्यालयाने या संदर्भात राज्यातील सर्व मुख्य अभियंत्यांना पत्राद्वारे कळविले असून या माध्यमातून राज्यातील वीज ग्राहकांचे लवकरात लवकर समाधान होण्यास हातभार लागेल असा विश्वास डॉ. राऊत यांनी व्यक्त केला.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.