मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचे मार्च महिन्याचे मानधन


पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या 38 नगरसेवकांनी कोरोना विरोधातील लढाईसाठी मार्च महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले आहे. या मानधनाची एकूण रक्कम पाच लाख 70 हजार रुपये इतकी आहे.


विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र पाठवून राष्ट्रवादीच्या 38 नगरसेवकांच्या मानधनाचा एकत्रित धनादेश मुख्यमंत्री सहायत्ता निधीत वर्ग करण्यास सांगितले आहे.


नाना काटे म्हणाले, मागील काही दिवसांपासून देशभरामध्ये कोरोना विषाणू संसर्गामुळे हाहा:कार माजला आहे. या विषाणूचा प्रसार महाराष्ट्रसह पुणे, पिंपरी चिंचवड शहरामध्ये देखील झाला आहे.


देशामध्ये सर्वांत जास्त रुग्ण महाराष्ट्रामध्ये सापडले आहेत. त्यांच्यावर राज्य सरकार व मनपाच्या वैद्यकीय विभागाकडून योग्य ते उपचार चालू आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पूर्ण देशामध्ये १४ एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. केवळ अत्यावश्यक सेवा चालू आहेत.


यामुळे राज्यातील उद्योग धंदे ठप्प झाले आहेत. त्यामुळे राज्य सरकारला मिळणारे उत्पन्नही कमी झाले आहे. राज्याची आर्थिक घडी बिघडली आहे. कोरोनाचे संकट आणि टाळेबंदीमुळे राज्याच्या आर्थिक उत्पन्नात झालेली घट लक्षात घेऊन तसेच कोरोना विरुध्दच्या लढ्याला नैतिक आणि आर्थिक बळ देण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी मार्च महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिले आहे.