महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या ‘महा ऐज’ उपक्रमाचा शुभारंभ
• महेश आनंदा लोंढे
मुंबई : सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत असलेल्या महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाने (MPBCDC) मुंबई येथे २० नामवंत संस्थासमवेत महत्वपूर्ण सामंजस्य करार केले आहेत. यामुळे राज्यात कौशल्य प्रशिक्षणातून येणाऱ्या तीन वर्षात २ लाख रोजगार आणि स्वयंरोजगार निर्माण होणार असून “महा ऐज” (MAHA-EDGE) महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ केला आहे.
सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत ‘महा ऐज’ (उद्योजकता विकास आणि रोजगार वाढ) (MAHA-EDGE)(Entrepreneurship Development and Growth in Employment) उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे आणि महाप्रीतचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अमोल शिंदे, यांच्यासह या क्षेत्रातील कौशल्य परिषद, विद्यापीठे, उष्मायन केंद्रांचे २० हुन अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.
‘महा ऐज’ हा महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ आणि ‘महाप्रित’ चा एक संयुक्त उपक्रम आहे. ज्या अंतर्गत लक्ष्यित समुदायातील दोन लाख लाभार्थ्यांना रोजगार आणि स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी आवश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण देण्याचे उदिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यापैकी १.५ लाख लोकांना विविध कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल. त्यामुळे त्यांना रोजगार मिळण्यास मदत होणार आहे. या उपक्रमाअंतर्गत ५० हजार लाभार्थ्यांना राज्यात उद्योजकता विकास कार्यक्रमाद्वारे प्रशिक्षित करण्याची योजना आखली आहे, ज्याचा उद्देश नवीन युगाच्या क्षेत्रात १०० हून अधिक स्टार्टअप्स तयार करणे हा आहे.
केंद्र सरकार आणि सामाजिक न्याय विभाग समाजातील सर्व घटकांच्या सर्वसमावेशक प्रगतीसाठी कटिबद्ध असून ‘महा ऐज’ हा उपक्रम तरुणांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून उपजीविका मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांवर परिणाम करेल, असा विश्वास सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्री. भांगे यांनी यावेळी व्यक्त केला.
सचिव श्री. भांगे म्हणाले की, अनुसूचित जातीतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांच्या उन्नतीसाठी काम करण्यासाठी महामंडळ आणि ‘महाप्रित’ सोबत सहकार्य करण्यासाठी सर्व सेक्टर स्किल कौन्सिल (SSC) यांचा समावेश करण्यात आला असून या कार्यक्रमासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांनी आभार मानून केंद्र सरकारच्या पीएम अजय योजनेअंतर्गत २० हजार लाभार्थ्यांना पहिल्या ट्प्यात प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली शासनाने शासन आपल्या दारी सारखे विविध उपक्रम हाती घेतले आहेत. महा ऐज उपक्रमांद्वारे युवकांवर अधिक लक्ष केंद्रित करून त्यांच्यासाठी अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करेल, अशी माहिती महामंडळाचे आणि महाप्रीतचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शिंदे यानी यावेळी दिली.
महामंडळाच्या माध्यमातून राज्यभरातील विद्यापीठे आणि उष्मायन केंद्रांच्या सहकार्याने या कार्यक्रमातून निवडलेल्या स्टार्टअप्सना त्यांचे उपक्रम तयार करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. असेही श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले, महामंडळाने त्या दिशेने आधीच एक पाऊल टाकले आहे आणि नाविन्यपूर्ण व्यवसाय कल्पना आणि इच्छुक उद्योजकांसाठी एक आधार म्हणून काम करण्यासाठी, अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि अत्यावश्यक सुविधांनी सुसज्ज असलेल्या नागपुरात नव्याने सुरू झालेल्या सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया (STPI) इनक्युबेशन सुविधेसोबत सहकार्य केले आहे. महामंडळाचे ५० नवोदित उद्योजकांना त्यांच्या स्टार्ट-अप्सची भरभराट करण्यासाठी सक्षमपणे त्यांच्या पाठीमागे उभे असल्याचे श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमादरम्यान महामंडळाने २० हून अधिक सेक्टर स्किल कौन्सिल (SSC) सह सामंजस्य करार केले. त्यामध्ये प्रामुख्याने अपोलो मेडस्कील्स सारख्या नामवंत संस्थांचा समावेश आहे. विज्ञान तंत्रज्ञान उद्यान, पुणे आणि गोंडवाना विद्यापीठ यांच्याशी महा ऐज उपक्रमाच्या अंमलबजावणीस सहकार्य करण्यासाठी सामंजस्य करारांवर यावेळी स्वाक्षरी करण्यात आल्या. या उपक्रमाची महामंडळाच्या mpbcdc.in and nbrmahapreit.in या संकेतस्थळावर नोंदणी करण्यात येत आहे.
यावेळी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक प्रशांत गेडाम, निवृत्त सह सचिव दिनेश डिंगळे, राज्यातील विविध विद्यापीठ, विविध बँका, सामाजिक न्याय विभाग व महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.