'हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४' ला जुन्नर येथे सुरुवात ; पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमातून इतिहास आणि कलासंस्कृतीचे सुंदर दर्शन
• महेश आनंदा लोंढे
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने आयोजित हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४' चा शुभारंभ जुन्नर येथे करण्यात आला. १९ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात उपस्थितांना राज्याच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडणार आहे.
महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासन यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेला हा महोत्सव म्हणजे कला, संगीत, साहस आणि इतिहास यांचा सुरेख संगम आहे. पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमांची सुरुवात विनायक खोत यांच्या हस्ते 'महादुर्ग फोर्ट वॉक' च्या उद्घाटनाने झाली. या सहलीच्या माध्यमातून पर्यटकांना जुन्नर परिसरातील इतिहासाचा वारसा पहायला मिळाला.
जुन्नर एज्युकेशन सोसायटीचे धनेशशेट संचेती यांच्या उपस्थितीत 'ॲडव्हेंचर झोन' या साहसी खेळांचे रोमांचक प्रदर्शन करण्यात आले . याचदरम्यान जुन्नर किल्ल्यावरील 'हेरिटेज वॉक' आणि संस्कृतीचे प्रदर्शन करणाऱ्या बुट्टे पाटील मैदानातील 'आर्ट डिस्ट्रिक्ट' प्रदर्शनामुळे सोहळ्याची रंगत वाढली.
पर्यटन संचालक बी. एन. पाटील, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सत्यशील शेरकर, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुस्कर, विभागीय अभियंता गणेश सिनाळकर यांच्या हस्ते जलाशय किनारी मनमोहक वास्तव्याचा अनुभव देणाऱ्या टेंट सिटीचे उद्घाटन करण्यात आले. बुट्टे पाटील मैदानातील कार्यक्रमस्थळाच्या संगीताने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.
श्री.शेरकर यांनी पॅरामोटरिंग झोनचे उद्घाटन केले. बुट्टे पाटील मैदानात वसलेल्या फूड डिस्ट्रिक्टमधील खाद्य महोत्सव खास आकर्षण आहे. येथील महिला बचत गटांनी तयार केलेल्या कलात्मक वस्तूंच्या स्टॉल्सचे उद्घाटन जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या आशाताई बुचके यांच्या हस्ते, तर द्राक्ष महोत्सवाचे उद्घाटन अनिल मेहेर यांच्या हस्ते करण्यात आले.
पहिल्या दिवसांच्या कार्यक्रमाची सांगता ही सूर्यास्तासोबत झालेल्या रात्रीच्या निरभ्र आकाशात तारकादर्शनाच्या मनमोहक अनुभवाने झाली.
दुसऱ्या दिवशी १८ फेब्रुवारी रोजी सायं. ६:३० ते ७:३० वा. 'गर्जा महाराष्ट्र माझा' ही नृत्य नाटिका, सायंकाळी ७:३० ते रात्री ९.३० वा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचे दर्शन घडवणारा 'गनिमी कावा' हा कार्यक्रम होईल.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.