देशातले नागरिक विकसित भारत संकल्प यात्रेकडे उज्ज्वल भविष्याची आशा म्हणून पाहत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातले नागरिक विकसित भारत संकल्प यात्रेकडे आपल्या उज्ज्वल भविष्याची आशा म्हणून पाहत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. देशभरातल्या विकसित भारत संकल्प यात्रेतल्या लाभार्थ्यांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधताना ते बोलत होते. गेल्या ५० दिवसात ११ कोटींहून अधिक लाभार्थी या यात्रेशी जोडले गेल्याचं ते म्हणाले. 

सरकारी योजनांच्या लाभांपासून कुणीही वंचित राहू नये, हाच या यात्रेचा उद्देश आहे. दैनंदिन गरजेसाठी लोकांना झगडावं लागू नये हाच सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळं गरीब, शेतकरी, महिला आणि युवकांवर केंद्र सरकारचं लक्ष असल्याचं ते म्हणाले. यात्रा सुरू झाल्यापासून लाखो जणांना प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेतून गॅस जोडणी मिळाली. सुरक्षा वीमा, जीवन ज्योती वीमा आणि प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ मिळाल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. यावेळी विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री भुपेंदर यादव, अर्जून मुंडा, ज्योतिरादित्य शिंदे उपस्थित होते. 

नाशिक जिल्ह्यात ओझरमध्ये झालेल्या कार्यक्रमात आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार उपस्थित होत्या. त्यांनी सरकारी योजनांची माहिती देणाऱ्या विविध स्टॉलचं उद्घाटन केलं आणि विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांना योजनांचे लाभ वितरीत केले. यावेळी त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यावर उपाययोजना करण्याचे आदेश शासकीय अधिकाऱ्यांना दिले.