केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते २६ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्रीय रस्ता वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल ईशान्येकडच्या राज्यांसाठीच्या १७ हजार ५०० रुपये खर्चाच्या २६ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी केली आणि ते देशाला अर्पण केले. गुवाहाटीमध्ये झालेल्या कार्यक्रमात दूरस्थ पद्धतीनं ही पायाभरणी करण्यात आली. ईशान्येकडची सर्व राज्यं वेगानं विकसित होत असल्याचं गडकरी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

फक्त आसाममध्ये गेल्या दहा वर्षांमध्ये एक लाख कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यात आल्याचं ते म्हणाले. आसाममध्ये १३६ प्रकल्प पूर्ण झाले आहेत आणि ४८ प्रकल्प नव्यानं सुरू होत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. काझिरंगा राष्ट्रीय उद्यान भागात ३५ किलोमीटरच्या अत्याधुनिक उन्नत रस्ते प्रकल्पाला आणि गुवाहाटी रिंग रोड प्रकल्पाला आपल्या मंत्रालयानं मंजुरी दिल्याचंही त्यांनी नमूद केलं.