विकसित भारत संकल्प यात्रा आता महानगरपालिका क्षेत्रातही पोहोचली

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं निघालेली विकसित भारत संकल्प यात्रा आता महानगरपालिका क्षेत्रातही पोहोचली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, नागपूर, नाशिक,वसई-विरार, छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी आज यात्रा सुरु होत आहे. 

ठाणे शहरात आज महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी यात्रेला हिरवा झेंडा दाखवला.  ठाणे शहरातल्या ७४ ठिकाणी दररोज दोन याप्रमाणे शिबिरं होणार आहेत. शहरी भागासाठीच्या योजनांपैकी महापालिकेशी संलग्न पीएम स्वनिधी, स्वच्छ भारत मिशन, पीएम ई-बस सेवा, अमृत, प्रधानमंत्री आवास योजना या योजनांबद्दल मार्गदर्शन केलं जाणार आहे.

छत्रपती संभाजीनगर इथं आज महापालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या उपस्थितीत विकसित भारत संकल्प यात्रेचं औपचारिक उद्घाटन झालं. ही यात्रा २२ डिसेंबरपर्यंत महानगरपालिका क्षेत्रातल्या४७ ठिकाणी जाऊन केंद्र शासनाच्या सर्व योजनांची माहिती देणार आहे. सोलापूर शहरात आज काळी मज्जिद भागात विकसित भारत संकल्प यात्रेचं आयोजन केलं होतं. यावेळी यावेळी चित्ररथाद्वारे नागरिकांमध्ये केंद्र शासनाच्या योजना बाबत जनजागृती करण्यात आली.

पालघर जिल्ह्यात 'विकसित भारत संकल्प यात्रा आज वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात दाखल झाली. वसई तालुक्यातल्या नायगाव मधून या यात्रेचा  प्रारंभ खासदार राजेन्द्र गावित, महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार, अभिनेता अरुण कदम,यांच्या हस्ते करण्यात आला.