दोन शासकीय रुग्णालयांमधे मोठ्या प्रमाणावर रुग्णांचे मृत्यू झाल्याच्या घटनेची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाची राज्यशासनाला नोटीस

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राज्यातल्या दोन शासकीय रुग्णालयांमधे मोठ्या प्रमाणावर रुग्णांचे मृत्यू झाल्याच्या घटनेची स्वतःहून दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने राज्यशासनाला नोटीस बजावली आहे.  सरकारी रुग्णालयांसाठी अर्थसंकल्पीय तरतुदीचा तपशील उद्या सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने महाअधिवक्ता वीरेंद्र सराफ यांना दिले. या प्रकरणी खाटा, जीवनावश्यक औषधं यांचा तुटवडा अ सल्याची सबब खपवून घेतली जाणार नाही असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात दोन दिवसांच्या कालावधीत ३१ रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनेची दखल न्यायालयाने आपणहून घ्यावी अशी मागणी करणारा अर्ज मोहित खन्ना या वकिलाने  आज दाखल केला होता. रुग्णालयातली पदांची स्थिती, औषधं, आणि शासकीय खर्च याची तपशीलवार माहिती घेऊन नंतर रीतसर याचिका दाखल करावी असं न्यायालयाने खन्ना यांना सांगितलं. छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयातही दोन दिवसात १४ रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.