भारत-यूके मुक्त व्यापार करार भविष्यात महत्त्वाचं योगदान देईल, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचं प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारत आणि यूके यांच्यादरम्यानचा एक आधुनिक, भविष्यवेधी मुक्त व्यापार करार 2030 पर्यंत व्यापार दुप्पट करण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यात मोलाचा हातभार लावू शकतो, असं प्रतिपादन ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी काल केलं. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.

या व्यापार करारामुळं भारतातल्या जवळपास पाच कोटी लघु आणि मध्यम उद्योगांसह सर्वच भारतीय निर्यातदारांना ब्रिटनच्या बाजारपेठांमध्ये वाव मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यूकेमध्ये खलिस्तान समर्थकांच्या वाढत्या कारवायांबाबत भारतानं व्यक्त केलेल्या काळजीचा पुनरुच्चार करून, कोणत्याही प्रकारचा कट्टरतावाद अस्वीकारार्हच असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सनदशीर मार्गानं आंदोलन करण्याच्या हक्काच्या नावावर हिंसक वर्तणूक करणं योग्य नाही. अशा प्रकारच्या हिंसाचाराला आळा घालणं, विभाजनवादी वृत्तींचा बीमोड करणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि यासाठी सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. खलिस्तान समर्थकांचा सामना करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलली जात असल्याचं त्यांनी सांगितलं.