भारताने एक जबाबदार जागतिक आर्थिक परिसंस्था तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे - निर्मला सीतारामन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं एक  जबाबदार जागतिक आर्थिक परिसंस्था तयार करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.  त्या आज मुंबईत चौथ्या ग्लोबल फिनटेक फेस्ट, 2023 च्या उद्घाटन सत्राला संबोधित करताना बोलत होत्या. आर्थिक परिसंस्था सर्वसमावेशक, लवचिक आणि शाश्वत असायला हवी, असं त्या यावेळी म्हणाल्या. 

तंत्रज्ञान हे एक सामान्य साधन असून ते एक  जबाबदार आर्थिक परिसंस्था तयार करण्यासाठी उपयोगी ठरू शकेल असं त्यांनी सांगितलं.अर्थमंत्री पुढे म्हणाल्या की, ही  परिसंस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना, आम्हाला भौतिक सीमा धोके, सायबर क्रिप्टो धमक्या, ड्रग आणि ड्रग माफिया, टॅक्स हेव्हन्स, करचोरी इत्यादीसारख्या विविध धोक्यांनी वेढले आहे. या प्रत्येक क्षेत्राकडे काळजीपूर्वक लक्ष दिल जात आहे याची खात्री करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा.

जागतिक सहकार्याविषयी बोलताना सीतारामन म्हणाल्या की, आपण एका बहु-ध्रुवीय, गतिमान आणि मजबूत जगात राहत असल्याने  अनेक आव्हानांना तोंड देण्यासाठी जागतिक सहकार्याला अत्यंत महत्त्व आहे. त्या पुढे म्हणाल्या की, जागतिकीकरणामुळे गरिबीचे निर्मूलन करण्यात मदत झाली आहे, असा आमचा विश्वास आहे. त्या  पुढे म्हणाल्या  की जागतिकीकरण महत्त्वपूर्ण आहे कारण जगात केवळ संपत्तीच्याच नव्हे तर कल्याण, लोकसंख्या, तंत्रज्ञान, डिजिटल साक्षरता इत्यादी बाबतीतही प्रचंड विषमता आहे. 3-दिवसीय ग्लोबल फिनटेक फेस्ट, 2023 मध्ये, जगभरातील वक्ते आणि प्रतिनिधींनी सर्वसमावेशक, लवचिक आणि टिकाऊ जग निर्माण करण्यासाठी प्रमुख मुद्द्यांवर आणि व्यवसाय मॉडेल्सवर चर्चा करण अपेक्षित आहे.