प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली रालोआ सरकारच्या काळात पैशाच्या पळवाटा बंद झाल्या असून जनतेचा पैसा योग्य कारणांसाठी वापरला जातो असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रालोआ सरकारच्या काळात सरकारी योजनांचा पैसा थेट लाभार्थ्यांना मिळत असून मधल्या मधे गडप होणं बंद झालं आहे, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. लोकसभेत अविश्वास दर्शक ठरावाच्या चर्चेदरम्यान त्या बोलत होत्या. गेल्या ९ वर्षात सरकारनं आर्थिक क्षेत्रात उचललेल्या पावलांमुळे भारत जगात पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनल्याचं त्यांनी सांगितलं. जागतिक स्तरावर इतर देशांच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्थेनं चमकदार कामगिरी केली आहे, असं त्या म्हणाल्या. २०१४ पूर्वीच्या युपीए सरकारच्या काळातल्या कामगिरीच्या पार्श्वभूमीवर गेल्या ९ वर्षातला तुलनात्मक आढावा त्यांनी आपल्या भाषणात मांडला.