सीमा देव यांचे निधन चटका लावणारे – मुख्यमंत्री

 

मुंबई : ‘चित्रपट सृष्टीत अभिनयाच्या जोरावर आणि प्रेमळ स्वभावाने आदराचे स्थान पटकावणाऱ्या चतुरस्त्र अभिनेत्री सीमा देव यांचे निधन चटका लावून जाणारे आहे, अशा दुःखद भावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

‘भारतीय चित्रपट सृष्टीत रमेश देव आणि सीमा देव यांनी वेगळी ओळख निर्माण केली होती. पडद्यावर आणि प्रत्यक्षातही आदर्श दाम्पत्य, प्रेमळ व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचे अनेकांशी स्नेहाचे संबंध होते. देव कुटुंबीय गत अनेक दशके कला क्षेत्राची सेवा करत आहे. सीमा देव यांनी अनेक चित्रपटांतून वैविध्यपूर्ण व्यक्तीरेखा साकारून आपल्या चतुरस्त्र अभिनयाचा परिचय दिला आहे. त्यांच्या जाण्याने देव कुटुंबीय आणि चाहत्यांवर आघात झाला आहे. त्यांना यातून सावरण्याचे सामर्थ्य मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली,’ असे मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.