दहा महिला चालकांना ई-रिक्षा खरेदीसाठी लोकसहभागातून अर्थसहाय्य – पालकमंत्री

 

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मिस्ट बेस्ड फाउंटन सिस्टिमचे उदघाटन

पुणे : शहरात ई-रिक्षा घेणाऱ्या १० महिलांना ई-रिक्षासाठी मिळणारे अनुदान वगळून इतर रक्कम लोकसहभागातून उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

पुणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते नॅशनल क्लिन एअर प्रोग्राम अंतर्गत मिस्ट बेस्ड फाउंटन सिस्टिमचे उद्घाटन आणि इलेक्ट्रिक पॅसेंजर रिक्षांसाठी अनुदान वाटप करण्यात आले. मनपा अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, विकास ढाकणे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नितीन शिंदे, 'एआरएआय'चे जितेंद्र पुरोहित, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी राजेंद्र मुठे, पर्यावरण विभागाचे उपायुक्त माधव जगताप आदी उपस्थित होते.

मंत्री श्री.पाटील म्हणाले, देशपातळीवर इलेक्ट्रिक रिक्षासाठी अनुदान देण्यात येत आहे. ई-रिक्षासाठी केंद्र शासनाचे आणि महानगरपालिकेचे मिळून एकत्रित १ लाख अनुदान मिळते. त्यामुळे साधारण एक रिक्षेसाठी चालकाला ३ लाख खर्च करावा लागेल, मात्र इंधनाची बचत होत असल्याने कुटुंबासाठी जास्त उत्पन्न मिळू शकेल. शहरातील प्रदूषण कमी करताना उत्पन्न वाढणार असल्याने रिक्षा चालकांनी इलेक्ट्रिक रिक्षेकडे वळावे. रिक्षा थांब्याजवळ इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारण्याबाबत महानगरपालिकेने नियोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

शहरात मेट्रोचा दुसरा टप्पा पूर्ण झाल्यावर २ लाख नागरिक इतर वाहनाऐवजी मेट्रोचा पर्याय वापरातील. तिसऱ्या टप्प्यानंतर ही संख्या ४ लाखावर पोहोचेल त्यामुळे प्रदूषण आणखी कमी होईल. प्रवाशांना घरापासून मेट्रो स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी ई रिक्षाचा उपयोग होईल. रिक्षासोबत इतर वाहनांसाठीही सीएनजी आणि इलेक्ट्रिकचा वापर करणेही गरजेचे आहे, असे मत पालकमंत्र्यांनी व्यक्त केले.

शहरातील चौकात बसविलेल्या मिस्ट बेस्ड फाउंटनमुळे हवेतील धूलिकण कमी होऊन प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वासही श्री. पाटील यांनी व्यक्त केला.

श्री.ढाकणे म्हणाले, पुणे शहरातील लोकसंख्या ७० लाखापर्यंत पोहोचली असून ५५ लाख वाहनांची नोंदणी झाली आहे. बाहेरील वाहनेही मोठ्या प्रमाणात येत असल्याने प्रदूषण वाढते आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी महापालिका अनेक स्तरावर प्रयत्न करीत आहे. ई-रिक्षांना अनुदान, ई बसेसची वापर, मिस्ट बेस्ड फाउंटन अशा विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात श्री.जगताप म्हणाले, केंद्र शासनामार्फत नॅशनल क्लिन एअर प्रोग्राम तसेच १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत महानगरपालिकेला ३५० कोटींचा निधी उपलब्ध झाला असून महानगरपालिकेमार्फत प्रत्येक इलेक्ट्रिक पेसेंजर ऑटो रिक्षा मालकाला रक्कम २५ हजार रुपये प्रति रिक्षा अनुदान देण्यात आले आहे. शहरातील प्रमुख चौकातील प्रदूषण कमी करण्यासाठी १० ठिकाणी मिस्ट बेस्ड फाउंटन उभारण्यात येत असून एकूण ४० ठिकाणी असे कारंजे उभारण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली.

ई- रिक्षा पंचायतीचे प्रतिनिधी नितीन पवार यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. ई-रिक्षेसाठी अनुदान देणारी पुणे ही देशातील पहिली महानगरपालिका आहे असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे प्रतिनिधी, रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी आणि रिक्षा मालक उपस्थित होते.

Popular posts
जल व्यवस्थापनासाठी लहान जल स्रोतांचं संवर्धन आणि पुनरुज्जीवन करणं आवश्यक - उपराष्ट्रपती
Image
‘बार्टी’च्या महासंचालकपदी धम्मज्योती गजभिये रुजू
Image
तिसऱ्या राष्ट्रीय पोषण महिन्यानिमित्त, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नागरिकांना कुपोषण-मुक्त भारतासाठी प्रतिज्ञा घेण्याचे आणि योगदान देण्याचे आवाहन
Image
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी नाशिक शहर संघचालक नानासाहेब गर्गे यांचं निधन
Image
९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी छगन भुजबळ यांची निवड
Image