मदुराईमध्ये रेल्वेच्या डब्याला आग लागून १० जणांचा मृत्यू

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) तामिळनाडूतल्या मदुराईमध्ये रेल्वेच्या डब्याला आग लागून १० जणांचा मृत्यू झाला आणि ७ जण जखमी झाले. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  खासगी व्यक्तींनी आरक्षित केलेला हा डबा यार्डमध्ये उभा होता. या डब्यातल्या प्रवाशांनी चहा आणि नास्ता बनविण्यासाठी अवैधरित्या गॅस सिलिंडरचा वापर केल्यानं ही आग लागल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

या डब्यातून एकूण ६५ व्यक्ती लखनौहून रामेश्वरमला आल्या होत्या. परतीच्या प्रवासात मदुराई रेल्वे स्थानकात आल्यानंतर हा डबा वेगळा काढून दुसऱ्या रेल्वेला लावला जाणार होता.  त्यावेळी ही आग लागली. अग्निशमन विभागाचे बंब मागवून सकाळी ७ वाजणयाच्या सुमाराला ही आग विझवण्यात आली. मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसंच या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.