प्रधानमंत्र्यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून उद्या ५०८ रेल्वे स्थानकांच्या विकास कामांचा प्रारंभ

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वेच्या अमृत भारत विकास योजने अंतर्गत, देशातील 508 रेल्वे स्थानकांचा आधुनिक तंत्रज्ञान आणि स्थानिक संस्कृतीच्या अनुषंगानं विकास करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून उद्या या 508 रेल्वे स्थानकांच्या विकास कामांचा प्रारंभ होणार आहे. या स्थानकांपैकी 44 स्थानकं महाराष्ट्रात आहेत. 

मध्य रेल्वेकडील 76 रेल्वे स्थानकांचा विकास केला जाणार असून त्यातील 38 स्थानकांची पायाभरणी केली जाणार असल्याचं मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवाणी यांनी काल मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितलं.  

या योजनेत पुणे रेल्वे विभागातील 16 रेल्वे स्थानक,अहमदनगर, सोलापूर विभागातील 15, नागपूर मध्य रेल्वेच्या 15 रेल्वे स्थानकांचा या योजनेत समावेश  करण्यात आला आहे.  पहिल्या टप्प्यात आकुर्डी, तळेगांव आणि कोल्हापूर या रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येईल, अशी माहिती रेल्वेच्या पुणे विभागाच्या व्यवस्थापक इंदू दुबे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.