महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात श्री सदस्यांच्या मृत्यूला सरकार जबाबदार - विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमादरम्यान झालेली घटना ही दुर्देवी असून, या घटनेच्या संदर्भातली वस्तुस्थिती तपासण्याकरता स्थापन केलेल्या समितीला एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य भाई जगताप यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. 

दरम्यान, या सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेला सांस्कृतिक विभागाइतकंच गृह खातंही जबाबदार असून, या घटनेतल्या श्री सदस्यांच्या मृत्यूला सरकार जबाबदार असल्याचा गंभीर आरोप, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. ते काल विधान परिषदेत बोलत होते. या संदर्भात गठीत समितीचा अहवाल प्रकाशित झाल्यानंतर गृहमंत्र्यांनी उत्तर देणं अपेक्षित होतं, असंही दानवे यांनी म्हटलं आहे. सरकारने रुग्णवाहिका, तसंच वैद्यकीय पथकांचं कार्यक्रमस्थळी नियोजन केलं होतं, तर घटनेवेळी या यंत्रणा कुठे होत्या असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.