महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातून तत्काळ टोमॅटो खरेदीचे केंद्राचे निर्देश

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) टोमॅटोच्या वाढत्या किरकोळ किमती रोखण्यासाठी केंद्र सरकारनं महाराष्ट्र, आंध्र प्रदेश,आणि कर्नाटकातून टोमॅटोची तत्काळ खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत. ग्राहक व्यवहार विभागानं राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ यांना तीन राज्यांतल्या मंडईंमधून ताबडतोब टोमॅटो विकत घेण्यास सांगितलं आहे.

गेल्या एका महिन्यात टोमॅटोच्या किरकोळ किमतीत सर्वाधिक वाढ झाली आहे. टोमॅटोची लागवड आणि वेचणीचे हंगाम तसंच विविध क्षेत्रांमधला फरक ही टोमॅटोच्या किंमतीतल्या हंगामी वाढीमागची प्रमुख कारणं आहेत. सध्या, गुजरात, मध्य प्रदेश आणि इतर काही राज्यांमधल्या बाजारपेठेत येणाऱ्या टोमॅटोचा पुरवठा बहुतांशी महाराष्ट्रातून, विशेषत: सातारा, नारायणगाव आणि नाशिकमधून होतो. तो या महिन्याच्या शेवटपर्यंत टिकण्याची अपेक्षा आहे. नाशिक जिल्ह्यातून लवकरच नवीन पिकाची आवक आणि पुढच्या महिन्यात नारायणगाव आणि औरंगाबाद पट्ट्यातून अतिरिक्त टोमॅटो पुरवठा होणं अपेक्षित आहे