बँकांनी सकारात्मकता, जबाबदारीची जाणीव आणि वचनबद्धता ठेऊन सचोटीनं कार्य केलं पाहिजे - नितीन गडकरी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : सामाजिक सुरक्षेच्या योजना राबवताना बँकांनी सकारात्मकता, जबाबदारीची जाणीव आणि वचनबद्धता ठेऊन सचोटीनं कार्य केलं पाहिजे, अस केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नागपूर मध्ये आयोजित ‘विदर्भ क्षेत्राच्या आर्थिक समावेशन’ आढावा बैठकीत ते आज बोलत होते. या बैठकीला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

बँकांनी कृषी ग्रामीण क्षेत्राशी निगडित कृषी उत्पादक कंपन्या आणि विदर्भातल्या मासेमार समुदायासोबत समन्वय साधून त्यांना किसान क्रेडिट कार्ड, मुद्रा, स्टँड अप इंडिया यासारख्या योजनांचा लाभ मिळवून दिला पाहिजे, असं ते म्हणाले. लोकांमध्ये वित्तीय साक्षरता वाढण्यासाठी नाबार्ड सारख्या  संस्थांनी  वित्तीय साक्षरता व्हॅनच्याद्वारे या योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन भागवत कराड यांनी यावेळी केलं. तर विदर्भात पीएम-स्वनिधी योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत असून पथविक्रेत्यांना डिजिटल व्यवहार शिकवण्यासाठी बँकांनी पुढाकार घ्यावा अशी सूचना देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.