केंद्र सरकारच्या विविध योजनांमुळे महिला, दलित, अल्पसंख्याक, आदीवासींच्या आयुष्यात निर्णायक बदल झाल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्र सरकारनं महिला, दलित, अल्पसंख्याक आणि आदिवासींसाठी आणलेल्या विविध योजनांमुळे या सर्वांच्या आयुष्यात निर्णायक बदल झाल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी म्हटलं आहे. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला ९ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्या आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होत्या. केंद्र सरकारच्या कामांची माहिती देताना त्या म्हणाल्या की, आज देशातल्या साडेतीन कोटी लोकांना पक्की घरं मिळाल्यामुळे त्यांना अभिमानानं जीवन जगता येत आहे. ११ कोटी ७२ लाख शौचालयांच्या बांधकामांमुळे माता भगिनिंना प्रतिष्ठा मिळाली. १२ कोटी लोकांना नळ पाणी योजनेचा लाभ मिळाल्यामुळे पाण्यामुळे होणाऱ्या आजारांमध्ये लक्षणीयरित्या घट झाली आहे.

कोरोना काळात ८० कोटी लोकांना मोफत शिधा मिळाल्यामुळे त्यांचं जगणं सुखकर झालं. आयुष्यमान भारत योजनेचा अनेक गरजुंनी फायदा घेतला आहे. मागासवर्गातल्या लोकांसाठी केंद्रानं निर्माण केलेल्या आयोगाला विरोधी पक्षांनी नेहमीच विरोध केला आणि आज हेच लोक विचारत आहेत, की सरकारनं मागासवर्गियांसाठी काय केलं. विरोधी पक्षांचा हा दुटप्पीपणा आहे, अशा शब्दात त्यांनी टीका केली. केंद्र सरकारच्या योजना जनसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी उद्या पासून ३० जून पर्यंत विशेष अभियान राबवलं जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी उपस्थित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस म्हणाले की, आधीच्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात अनेक घोटाळे झाले, मात्र मोदी सरकारवर एकही डाग नाही. फडनवीस यांनीही केंद्र-राज्य सरकारच्या अनेक योजनांची माहिती दिली.