कांद्याला बाराशे रुपये क्विंटल असा भाव मिळाला पाहिजे असं केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचं मत

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कांद्याचा उत्पादन खर्च आणि बाजारात मिळणारा भाव यात प्रचंड तफावत असून सध्या कांदा उत्पादकांची अवस्था बघता बाराशे रुपये क्विंटल असा भाव मिळाला पाहिजे असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी नाशिक येथे व्यक्त केलं एका कार्यक्रमानिमित्त ते नाशिकमध्ये होते. गुजरात राजस्थान सह अन्य अनेक राज्यांमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जात आहे महाराष्ट्रात केवळ मदत देण्याबाबत चर्चा केली जात आहे त्यामुळे महाराष्ट्राने देखील शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत तातडीने निर्णय घेतला पाहिजे असे ते म्हणाले.

नाफेडची कांदा खरेदीची योजना चांगली असली तरी आता निर्यातीवर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. नागालँड मधे एनपीपीच्या मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिल्याबाबत माध्यम प्रतिनिधींनी छेडलं असता ते म्हणाले की याचा अर्थ भाजपाला पाठिंबा दिला असा होत नाही. स्थानिक स्तरावरच्या समस्या सोडवण्यासाठी सर्व पक्षीय पाठिंबा देण्यात आला आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. कांद्यासह शेतमालाला हमी भाव मिळावा यासह नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काल चांदवड तालुक्यात मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. यावेळी चांदवडच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. कांद्याला अडीच हजार रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक कोडी झाली होती.