संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राच्या पहिल्याच दिवशी राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरुन गदारोळ

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात पहिल्याच दिवशी सत्ताधारी पक्ष सदस्यांनी गदारोळ केल्यानं कामकाज तहकूब करावं लागलं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लंडनमध्ये भारतातल्या लोकशाहीबाबत केलेल्या वक्तव्यावरुन गदारोळ झाल्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेचं कामकाज सकाळी सुरु झालं तेव्हा, सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरु केली.

राहुल गांधी यांनी आपल्या वक्तव्यानं देशाचा अपमान केल्याचा मुद्दा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उपस्थित केला. त्यांच्या या वक्तव्याचा सभागृहाच्या सर्व सदस्यांनी निषेध करायला हवा, आणि राहुल गांधी यांना  माफी मागायला सांगावं, अशी मागणी त्यांनी केली. हाच मुद्दा पुढे नेत, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, राहुल गांधी यांनी अमेरिका आणि युरोपला भारताच्या अंतर्गत व्यवहारांमध्ये हस्तक्षेप करायला सांगितलं, ही गोष्ट निषेधार्ह आहे. त्यानंतर विरोधी पक्ष सदस्यही हौद्यात उतरले. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष सदस्यांमध्ये घोषणायुद्ध सुरु असतानाच, भारतीय लोकशाही पुरेशी मजबूत असल्याचं जगाने मान्य केलं आहे, असं सभापती ओम बिर्ला यांनी सांगितलं.

सदस्यांनी शांतता राखावी, असं आवाहन वारंवार करूनही गोंधळ सुरूच राहिल्यानं सभागृहाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. राज्यसभेतही आज गोंधळाचं वातावरण राहिलं. राहुल गांधी यांनी आपल्या वक्तव्यानं भारताची लोकशाही, न्याय संस्था, लष्कर आणि प्रसार माध्यमांचा अपमान केल्याचा मुद्दा भाजपा नेते पियुष गोयल यांनी उपस्थित केला. गांधी यांनी याबद्दल माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, भारतातली सध्याची स्थिती जगाला माहीत असल्याचं सांगत, विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी गोयल यांच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला, आणि भारताचं कामकाज संविधानानुसार चालत नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्ष सदस्यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी सुरु केली. आपण कोणत्याही सदस्याला बोलण्यापासून रोखलं नसल्याचं अध्यक्ष जगदीप धनखड यांनी सांगितलं. त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्यानं सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्यापूर्वी दोन्ही सदनांनी नुकतंच निधन झालेल्या सदस्यांना आदरांजली वाहिली.