राहुल गांधी यांनी माफी मागावी या मागणीवरुन संसदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून माफीच्या मागणीसाठी संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सुरुवातीला २ वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केलं. राहुल गांधी यांनी माफी मागावी म्हणून लोकसभेत सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी आज पुन्हा घोषणाबाजी केली. काँग्रेस, द्रमुक आणि इतर विरोधी पक्षांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा दाखला देत त्याला प्रत्युत्तर दिलं. लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी दोन्ही बाजूच्या सदस्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आणि सर्व विषयांवर चर्चा करण्यासाठी तयारी असल्याचं सांगितलं. मात्र त्यानंतरही गोंधळ सुरू राहिल्यानं लोकसभेचं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं. 

राज्यसभेत सुरळीत कामकाज सुरू झालं. राज्यसभा सदस्यांनी ऑस्कर पुरस्कार जिंकल्याबद्दल RRR आणि द एलिफंट व्हिस्परच्या सदस्यांचं कौतुक केलं. भारतीय ज्ञानाची जगभरात होत असलेली कदर यातून दिसत असल्याचं राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड म्हणाले. त्यानंतर अदानी समुहाच्या समभागातल्या घसरण प्रकरणी संयुक्त संसदीय चौकशी समितीच्या मागणीसाठी विरोधी पक्षांनी दिलेला स्थगन प्रस्ताव धनखड यांनी फेटाळला. त्यानंतर सभागृह नेते पीयूष गोयल यांनी राहुल गांधी यांच्याकडून माफीची मागणी केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसच्या सदस्यांनी अदानी प्रकरणाच्या मुद्द्यावरुन अध्यक्षांच्या समोरच्या जागेत येऊन गोंधळ घातला. यामुळं राज्यसभेचं कामकाज सुरुवातीला २ वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं. 

त्यापूर्वी अदानी समुहाच्या मुद्द्यावर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आप आणि भारतीय राष्ट्र समितीच्या सदस्यांनी संसद परिसरात गोंधळ घातला. याप्रकरणी संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची त्यांची मागणी आहे.