विधानपरिषदेत हौद्यात उतरून निषेध करत विरोधकांची घोषणाबाजी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना देशद्रोही म्हटल्याचं सांगत विरोधकांनी आज विधानपरिषदेत हौद्यात उतरून निषेध करत घोषणाबाजी केली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित करत मुख्यमंत्र्यांचं हे वक्तव्य लोकशाहीला घातक असल्याचं सांगितलं. हे सरकार महाराष्ट्रद्रोही असल्याचं सांगत विरोधकांनी काल चहापानावर बहिष्कार टाकला मात्र यासाठी विरोधकांना मुख्यमंत्र्यांनी देशद्रोही संबोधलं यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी विरोधकांनी केली. त्यापूर्वी आज परिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव भाजपाचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी मांडला, त्याला भाजपचे राम शिंदे यांनी अनुमोदन दिलं. वर्ष २०२२-२३ च्या पुरवणी मागण्याही आज सादर करण्यात आल्या. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी निरंजन डावखरे, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे आणि जयंत आसगावकर यांची तालिका सभापती म्हणून निवड केली.