बेलापूर जेट्टी ते गेटवे ऑफ इंडिया ही वॉटर टॅक्सी जलसेवा बेलापूर इथून सुरू

 

मुंबई (वृत्तसंस्था) : नवी मुंबईतल्या बेलापूर जेट्टी ते गेटवे ऑफ इंडिया ही वॉटर टॅक्सी जलसेवा राज्याचे कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते आज बेलापूर इथून सुरू करण्यात आली. या वॉटर टॅक्सीमुळे बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया हे अंतर एका तासात पार करता येणार आहे. या जलमार्गांवर प्रवासी वाहतूक सुरु करण्यासाठी ८कोटी३७ लाख रुपये खर्च करुन या प्रवासी जेट्टीचे बांधकाम करण्यात आलं आहे, यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने प्रत्येकी ५० टक्के निधी उपलब्ध करून दिला आहे.

गेल्या वर्षी बंदरे आणि जलमार्ग केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते बेलापूर जेट्टीचं उद्घाटन आणि वॉटर टॅक्सी सेवेचं ध्वजांकन करण्यात आलं होतं. मात्र या सेवेचे दर जास्त असल्याने वर्षभरात या मार्गावर प्रवासी वाहतुकीला प्रवाशांनी पसंती दिली नाही. आता प्रवाशांचा प्रतिसाद पाहून जलप्रवासाचे दर आणखी कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल, तसेच जलवाहतुकीच्या फेऱ्यांची संख्याही वाढवली जाईल अशी मंत्री दादा भुसे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.