महाराष्ट्र मिलेट मिशनसाठी २०० कोटी रूपयांची तरतूद - मुख्यमंत्री

 


मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात भरडधान्य उत्पादन क्षेत्र वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन, आणि त्या उत्पादनांना योग्य हमीभाव मिळेल यासाठी राज्य शासन आग्रही आहे म्हणून महाराष्ट्र मिलेट मिशनसाठी २०० कोटी रूपयांची तरतूद केली आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितलं. महाराष्ट्र मिलेट मिशनचा प्रारंभ आज मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते. हे मिशन शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी महत्वाचं ठरणार असून ते पहिलं पाऊल आहे असं ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या भरडधान्यांना जगात प्रतिष्ठा मिळवून दिली असून आपण हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून साजरा करत असल्याचा आपल्याला विशेष आनंद वाटत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ही कमी पाण्यात येणारी पिकं असून त्याचा फायदा कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना होईल असंही त्यांनी सांगितलं.