आजमितीला जगातील अनेक सभ्यता नष्ट झाल्या आहेत परंतु भारतीय सभ्यता मात्र अबाधित असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आजमितीला जगातील अनेक सभ्यता नष्ट झाल्या आहेत परंतु भारतीय सभ्यता मात्र अबाधित असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. राजस्थानातील भीलवाडा जिल्ह्यातील मालासेरी डुंगरी इथं भगवान देवनारायण यांच्या एक हजार १११ व्या अवतरण महोत्सवात ते बोलत होते. प्रधानमंत्री पुढं म्हणाले की,देशात भौगोलिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि वैचारिक फूट पाडण्याचे अनेक प्रयत्न अयशस्वी झालेत. भारताच्या हजारो वर्षांच्या इतिहासात सामाजिक शक्तीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. प्रधानमंत्री मोदी यांनी पुढं सांगितलं की, प्रत्येक काळखंडात समाजाला दिशा देण्याचं काम काही शक्तींनी केलं आहे. भगवान देवनारायण देखील असा एक अवतार होता.त्यांनी नागरिकांना दिशा देण्याचं काम केलं.तसंच सामाजिक सौहार्दाचं वातावरण निर्माण केलं. त्यामुळेच आज भगवान देवनारायण यांच्यावर अनेकांचा विश्वास आहे.प्रधानमंत्री मोदी भाषणात पुढं म्हणाले की, समाजातील वंचित वर्गाचा विकास व्हावा,यासाठी गेल्या आठ-नऊ वर्षांत विविध प्रकारचे प्रयत्न झाले आहेत. त्याअंतर्गंत नागरिकांना वीज, पाणी, आरोग्य, घर आणि बँकिंग सुविधा मिळाल्या आहेत. सरकारनं शेतीसाठी पाणी आणि पशुधनाला संरक्षण दिलं आहे.त्याचप्रमाणे पहिल्यांदा पशुपालकांना किसान क्रेडिट कार्ड दिल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.