जगभरातल्या एकूण कुष्ठरोग्यांपैकी ५२ टक्के भारतात आहेत ही चिंतेची बाब - भारती पवार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जगभरातल्या एकूण कुष्ठरोग्यांपैकी ५२ टक्के भारतात आहेत ही चिंतेची बाब आहे, असं प्रतिपादन आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री भारती पवार यांनी आज केलं.

नवी दिल्लीत राष्ट्रीय कुष्ठरोग विरोधी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. मात्र देशात प्रतिवर्षी कुष्ठरोगाच्या रुग्णसंख्येत घट होत असल्यांचंही त्यांनी म्हटलं आहे. वर्ष २०१४-१५ मध्ये दर दहा हजार लोकसंख्येमागे शून्य पूर्णांक एकोणसत्तर शतांश कुष्ठरोगग्रस्त होते ती संख्या कमी होऊन २०२१-२२ मध्ये शून्य पूर्णांक पंचेचाळीस शतांश झाली आहे, असं त्यांनी नमूद केलं.

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन योजना तसंच राज्य आणि सामान्य नागरिकांच्या योग्य सहकार्याने कुष्ठरोगाशी दोन हात करण्याचा ठाम निर्धार सर्वांनी करायला हवा असंही त्या म्हणाल्या.कुष्ठरोगावरील प्रतिजैविकांचा प्रतिरोध टाळण्यासाठीच्या राष्ट्रीय मार्गदर्शक तत्वप्रणालीचं त्यांनी यावेळी उद्घाटन केलं.