मादक पदार्थांची तस्करी तसंच अवैध व्यापारावर नियंत्रणासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मादक पदार्थांची तस्करी तसंच इतर अवैध व्यापारावर नियंत्रणासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सांगितलं. नवी दिल्लीत महसूल गुप्तचर संचालनालयाच्या ६५ व्या स्थापना दिनानिमित्त त्या बोलत होत्या. अमली पदार्थांच्या बेकायदा व्यापारासंदर्भातली माहिती मिळावी यासाठी सहकारी देश आणि त्यांच्या संस्थांशी समन्वयानं काम करणं महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं. या संदर्भातले गुन्हे शोधण्यासाठी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी तंत्रज्ञानाचा अधिक वापर करावा, असं आवाहन त्यांनी केलं. सीमा सुरक्षित ठेवण्याइतकंच माहिती सुरक्षित ठेवणं महत्त्वाचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. त्यांनी देशात होणाऱ्या कोकेन तस्करीबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी भारतातील तस्करीविषयीचा २०२१-२२ चा अहवाल यावेळी प्रसिद्ध केला. संघटित तस्करीचे कल, व्यावसायिक फसवणूक आणि आंतरराष्ट्रीय सक्तवसुली कारवाया आणि सहकार्य यांचं विश्लेषण या आहवालात आहे. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्रा पंकज चौधरी, महसूल सचिव संजय मल्हाेत्रा उपस्थित होते.