सहकार क्षेत्रातील बँकेच्या अडचणी सोडविण्यासाठी सहकार विभाग प्रयत्नशील - राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे

 

पुणे : सहकार क्षेत्रातील बँकेच्या अडचणी सोडविण्यासाठी सहकार विभागाच्यावतीने नेहमीच प्रयत्न करण्यात येतो. नागरी सहकारी बँकेला येणाऱ्या अडचणी विभागाकडे पाठवाव्यात, त्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे आवाहन राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी केले आहे.

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था पुणे शहर व ग्रामीण कार्यालय आणि पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन लि. पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात 'जिल्ह्यातील नागरी सहकारी बँका समोरील आव्हाने' या विषयावर आयोजित चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहकारी संस्था अप्पर निबंधक शैलेश कोतिमिरे, विभागीय सहनिबंधक संजयकुमार भोसले, सहकारी संस्था पुणे शहर जिल्हा उपनिबंधक संजय राऊत, पुणे ग्रामीण जिल्हा उपनिबंधक मिलींद सोबले, पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोशिएशनचे अध्यक्ष ॲड सुभाष मोहिते, बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ विद्याधर अनास्कर, गणेश निमकर, नागरी सहकारी बँकेचे पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. कवडे म्हणाले, सहकार व्यवस्था बळकटीकरणासोबतच बदलत्या काळानुरुप आवाहनाला सामोरे जातांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे. सहकार व्यवस्था टिकविण्यासाठी सहकारी बँकानी त्रुटीचा शोध घेऊन त्या कमी करण्यासाठी नियोजन करावे.
बँकाना येणाऱ्या अडचणीवर आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करण्याची आणि त्या आधारे प्रशिक्षणाची गरज आहे. प्रशिक्षणामुळे ज्ञानात भर पडून क्षमतावृद्धी होते. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना अद्ययावयत तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण द्यावे. कर्ज वितरण प्रक्रियेत सुलभता आणावी.

बँकानी ग्राहकांला उत्तम बँकिंग सुविधा देत त्यांना समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करावे. ग्राहक समृद्ध झाल्यास आपोआपच बँकेची प्रगती होईल. ग्राहकांनी दिलेल्या अभिप्रायाच्या आधारे कामकाजात बदल करुन ग्राहकाभिमूख सेवा देण्यासाठी प्रयत्न करावे. एकूणच बँकिंग व्यवस्था वृद्धिंगत करण्यसाठी प्रयत्नशील रहावे.

आरबीआयकडून निर्गमित होणाऱ्या परिपत्रकाचा बारकाईने अभ्यास करावा. आरबीआयसोबत सहकारी नागरी बँकांनी मिळून प्रशिक्षण आयोजित करावे. संचालकांनी बँकिंग संकल्पनाचा बारकाईने अभ्यास करुन आपल्याकडे असलेले ज्ञान, अनुभव आणि कौशल्याचा वापर करुन ग्राहकाभिमूख बँकिंग सुविधा दिली पाहिजे. बँकेची विश्वार्हता, पारदर्शकता जपली पाहिजे. ग्राहकांची फसवणुक होणार नाही याकडे लक्ष द्यावे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन ग्राहकाला डिजीटल सेवा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने केलेले कामगिरी कौतुकास्पद असल्याचे श्री.कवडे म्हणाले.

श्री. कोतिमिरे म्हणाले, शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून नवीन खातेदार करण्यासाठी प्रयत्न करावे. शाखाअंतर्गत येणाऱ्या कार्यक्षेत्रात आर्थिक साक्षरता कार्यक्रम आयोजित करावे. बँकेच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहचव्यात. नागरिकांच्या दारापर्यंत सेवा पोहचविण्यासाठी प्रयत्न करावे. बँकांनी स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी काळाप्रमाणे कामकाजात बदल करावे.

श्री.अनास्कर व श्री. निमकर यांनीही यावेळी विचार व्यक्त केले.

यावेळी सहकार आयुक्त श्री. कवडे यांच्या हस्ते शुक्रवार पेठ येथील विद्या सहकारी बँकेच्या दिनदर्शिकेचे अनावरण करण्यात आले.

Popular posts
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कार्यक्षेत्रात स्वच्छ महाराष्ट्र अभियान - निबंध, चित्रकला, घोषवाक्य स्पर्धा
Image
जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून मुंबई आणि महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन
Image
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृतज्ञतापूर्वक वंदन
Image
राज्यातील कामगारांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती - कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती
Image
भारतानं सादर केलेल्या अजेंड्याला सदस्य देशांची प्राथमिक पातळीवर सहमती
Image