अक्कलकोट कर्नाटकात समाविष्ट करण्याची मागणी करणाऱ्या काही गावांची माघार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या, कर्नाटकात समाविष्ट करण्याची मागणी करणाऱ्या काही गावांनी आता माघार घेतली आहे. काही गावांवर कर्नाटकानं दावा केल्यानंतर अक्कलकोट तालुक्यातल्या ११ गावांनी ’सुविधा द्या; नाही तर कर्नाटकात जाण्याची परवानगी तरी द्या’अशा आशयाची निवेदनं स्थानिक जिल्हा प्रशासनाला देत आंदोलनाचा पवित्रा घेतला होता.

कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्न सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ट असताना कोणालाही असा निर्णय घेता येत नाही, हा विषय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अधिकार कक्षेच्या बाहेरचा आहे, त्यामुळे कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेला यामध्ये ठराव घेता येत नाही. असं म्हणत, या ग्रामपंचायतींच्या सदस्य आणि सरपंच यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याचे संकेत जिल्हा प्रशासनाकडून मिळताच ११ पैकी ६ ग्रामपंचायतींनी जिल्हा प्रशासनाला दिलेली निवेदनं रद्द करत आंदोलनातून माघार घेतली.