विकासप्रकल्प वेळेत पूर्ण करण्याची नवीन कार्यसंस्कृती देशात रुजत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातले विकास प्रकल्प अत्यंत जलदगतीनं पूर्ण होत असून ते रखडत नाहीत, विकास प्रकल्पांची पायाभरणी करून ते निर्धारित मुदतीत पूर्ण केले जातात आणि त्यांचं उद्घाटन केलं जातं, अशी नवीन कार्यप्रणाली देशात रुजत  आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज अरुणाचल प्रदेशमधल्या इटानगर इथं डोंयी पोलो विमानतळाचं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. प्रलंबित्व, कार्यात अडथळे आणि अनावश्यक विभाजन या गोष्टींना थारा न देता कार्य पूर्णत्वाला नेण्याला सरकारचं प्राधान्य असल्याचं त्यांनी सांगितलं. विकासाची गंगा आता सर्वदूर पोहोचली  आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले. 2014 नंतर प्रत्येक गावात वीज पोहोचवण्याची मोहीम सुरू करण्यात आली असून ईशान्य भारतातल्या  अत्यंत दुर्गम भागात देखील आता वीज पोहोचली आहे, अरुणाचल प्रदेशातल्या अनेक गावांनाही याचा फायदा झाला आहे. सीमाभागातली  गावं अधिक सक्षम  करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत ईशान्य भारतातल्या नागरिकांना उपचारांसाठी पाच लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य दिलं जातं , असं ते म्हणाले. प्रधानमंत्री आज त्यांचा लोकसभा मतदारसंघ वाराणसी ला भेट देणार असून काशी तमिळ संगमम् महोत्सवाचं उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर ते गुजरातमधे प्रचारसभा घेतील.